जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जलसंपदा विभाग

कालव्याचे आवर्तन सुटूनही…ही चारी कोरडीच,शेतकऱ्यांचा संताप!

न्यूजसेवा

कुंभारी-(मधुकर वक्ते)

  गोदावरी उजव्या कालव्यातून आवर्तन सुटून तब्बल पंधरा दिवस उलटून गेले तरी हरिसन ब्रँच चारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळाले नसल्याने संपूर्ण पंचक्रोशीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.पाटबंधारे विभागाच्या निष्काळजी व ढिसाळ नियोजनामुळे शेती,जनावरे आणि ग्रामीण जनजीवन गंभीर संकटात सापडले असून जलसंपदा विभागाच्या विरोधात कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच यशवंत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

 

“शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर प्रशासनाने दुर्लक्ष करणे अत्यंत संतापजनक आहे.वेळेवर आवर्तन न मिळाल्यास पिकांचे मोठे नुकसान होईल आणि शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील.त्यामुळे प्रशासनाने तातडीने हरिसन ब्रँचचारीला पाणी सोडावे;अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल”-यशवंत आव्हाड,सरपंच,जेऊर कुंभारी ग्रामपंचायत.

  गोदावरी कालव्याना जलसंपदा नाशिक विभागाने साधारण १५ दिवसापूर्वी शेती सिंचन आणि पिण्याचे आवर्तन सोडले आहे.नेहमीच्या नियमानुसार चितळी परिसरात पाणी पोहोचल्यानंतर दोन ते तीन दिवसांत हरिसन ब्रँच चारीला पाणी दिले जाते.मात्र यंदा आवर्तन सुटून पंधरा दिवस उलटूनही हरिसन ब्रँच परिसर कोरडाच असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषतः जेऊर कुंभारी,कोकमठाण,पानमळा,चांदेकसारे आणि डाऊच खुर्द परिसरातील शेतकरी पूर्णपणे या आवर्तनावर अवलंबून असल्याने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.उन्हाचा तीव्र तडाखा वाढत असताना भूजल पातळी खोल जाऊन अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून हिरव्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने खरीपपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेली पूर्वतयारी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून आगामी हंगाम धोक्यात आल्याची भावना शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या मते,पाटबंधारे विभागाकडून हरिसन ब्रँच परिसराकडे सातत्याने दुजाभाव केला जात आहे.प्रत्येक आवर्तनावेळी पाण्यासाठी शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पायपीट करावी लागते.वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जाते.काही प्रसंगी आश्वासने दिली जात असून पिकांचा मौसम संपून गेल्यावर शेती सिंचनाचे पाणी दिले जाते.त्यामुळे पिके हातची निघून जातात असा अलिखित शिरस्ता बनला आहे.त्याकडे पाहण्यास कोणाही लोकप्रतिनिधीला वेळ असल्याचे दिसून येत नाही.परिणामी शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.

यशवंत आव्हाड,सरपंच,जेऊर कुंभारी.

  दरम्यान या गंभीर प्रश्नाकडे नाशिक जलसंपदा विभागाने तातडीने लक्ष न दिल्यास मोठ्या प्रमाणात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा सरपंच यशवंत आव्हाड यांनी दिला आहे.

  दरम्यान त्यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात नाशिक जलसंपदा विभागावर खरपूस टीका करताना म्हटले आहे की,“शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर प्रशासनाने दुर्लक्ष करणे अत्यंत संतापजनक आहे.वेळेवर आवर्तन न मिळाल्यास पिकांचे मोठे नुकसान होईल आणि शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील.त्यामुळे प्रशासनाने तातडीने हरिसन ब्रँचचारीला पाणी सोडावे;अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल” असा इशारा शेवटी सरपंच आव्हाड यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close