कोपरगाव शहर वृत्त
कोपरगावात अक्षयतृतीयाच्या दिवशी शिमगा ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीत सुभद्रानगर हद्दीत स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आज सदर कार्यक्रमाची नेमकी जागा कोणती आणि किती याचा जाबसाल आ.काळे गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब आढाव यांनी केला असता त्याला हरकत घेऊन कोल्हे गटाचे काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी हरकत घेऊन आढाव यांना धक्काबुक्की केली असल्याची धक्कादायक माहिती हाती आल्याने आज अक्षय तृतीयाच्या दिवशी कोपरगाव शहरातील नागरिकांना शिमगा अनुभवायला मिळाला असल्याचे दिसून आले आहे.याबाबत दोन्ही गटाकडून उलटसुलट दावे केले आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

“सदर काम हे आ.आशुतोष काळे यांनी,”महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा-अभियान योजनेतून ३७ लाख रुपये प्रशासक काळात मंजूर केले आहे.त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यात आणखी १० लाख रुपयांची भर घातली असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे या कार्यक्रमाचे भूमिपजन करण्याचा नैतिक अधिकार आ.आशुतोष काळे यांनाच आहे अन्य कोणालाही नाही”- गौरी मंदार पहाडे,गटनेत्या,राष्ट्रवादी अजित पवार गट.
कोपरगाव शहरात काळे आणि कोल्हे यांचा वाद काही नवा नाही आता तो तिसऱ्या पिढीत साळसूदपणे सुरू आहे.आपली संस्थाने सुरक्षित करून जनतेच्या अंगणात असे अकाली शिमगे हे काही शहर आणि तालुक्यातील जनतेला आणि मतदारांना नवे नाही.कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत माजी आ.कोल्हे यांचा गटाचे अध्यक्ष निवडून आल्यानंतर आगामी काळात काळे आणि कोल्हे गटात आगामी पाच वर्षे दोन रेड्यातील टकरी होणार आणि जनतेच्या विकासाच्या बोऱ्या वाजणार हा अंदाज खरा ठरताना दिसतो आहे.कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या कलगीतुरा रंगला होता.त्यानंतर मागील पंधरवड्यात प्रसाद नाईक यांच्या ;रचना स्क्वेअर’ या व्यावसायिक इमारतीच्या उद्घाटनात नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांनी आपण मुख्यमंत्री यांच्याकडून (पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना टाळून ) शहर विकासाची कामे मंजूर करून आणू असे खुसपट काढल्यावर त्याच जागेवर गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी मध्ये पालक मंत्री यांचे स्टेशन लागणारा असून त्यांचे सहकार्य लागू शकते असल्याची जाणीव करून दिल्याने नगराध्यक्ष संधान आणि विवेक कोल्हे यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.तो वाद मिटतो न मिटतो तो आज अक्षयतृतीयाचा मुहूर्त काढून (नगरपरिषदेच्या? ) कोल्हे गटांचे वतीने आज सुभद्रानगर येथील स्वामी समर्थ केंद्रासाठी दि.१८ जुलै २०२५ मध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा-अभियान योजनेतून ३७ लाख रुपये व आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लक्ष रुपये असा एकूण ४७ लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचा कार्यारंभ आदेश झालेला होता.त्याचे भूमिपूजन आज सकाळी १०.३० वाजता आयोजित केले होते.त्यावेळी कार्यक्रमास आ.काळे गटासह माजी आ.कोल्हे गटाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

“आमचे प्रभागात कार्यक्रम असताना व कार्यक्रमास निधी आ.आशुतोष काळे यांचा असताना या कार्यक्रम पत्रिकेत केवळ नगराध्यक्ष पराग संधान व मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे दोघांचे नावे होती आमचे कोणाचेही नाव नाही ही चिंतेची बाब आहे”-जनार्दन कदम,नगरसेवक,कोपरगाव नगरपरिषद.
दरम्यान यावेळी जागेचे मुळ मालक असलेले व त्यांची अद्याप काही जागा त्या ठिकाणी शिल्लक असल्याने पूर्वाश्रमीचे कोल्हे गटाचे कार्यकर्ते व वर्तमानात काळे गटात सक्रिय असलेले बाळासाहेब आढाव यांना कुदळ मारण्याची विनंती केली असता त्यांनी,”तुमचे क्षेत्र किती ? तुम्ही आधी जागा मोजून घ्या आणि जागा निश्चितीकरण झाल्यावर काम सुरू करा” अशी विनंती आयोजक व स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी हरीभाऊ गिरमे यांना केली होती.त्यावेळी कोल्हे यांनी धार्मिक काम आहे अडचण आणू नका अशी विनंती केली असता आढाव यांनी,”धार्मिक असले म्हणून त्या नावाखाली तुम्ही निव्वळ लुटायचे काम करू नका” असा शब्द प्रयोग त्यांनी केल्याने त्या वादाला तोंड फुटले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे.त्यावर सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आक्षेप घेतला व आम्ही सरकारी निधीतून काम करत आहोत तुम्ही लुटण्याची भाषा कशी करता ? असा जाबसाल केला आहे.त्यावेळी विजय वाजे यांनी बाळासाहेब आढाव यांना मागे ढकलले त्यावरून हे रणकंदन पेटले असल्याची माहिती हाती आली आहे.त्यावेळी विवेक कोल्हे हे शेवटी मोठमोठ्याने अरे,”थांबा…!थांबा…! असे आवाहन करताना दिसत आहेत.त्यात त्यावेळी त्या वादात नगराध्यक्ष पराग संधान,माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पाठक,हरीभाऊ गिरमे,अनिल आव्हाड,भाजप गटाचे गटनेते प्रसाद आढाव,नगरसेवक अतुल काले,वैभव गिरमे,माजी नगरसेवक विजय वाजे,मंदार पहाडे,रमेश गवळी,माजी पदाधिकारी कालविंदर दडियाल,शैलेश साबळे,सचिन गवारे,सुनील गंगुले,अनिरुद्ध काळे,आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.त्यावेळी प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक जनार्दन कदम हेही उपस्थित होते.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचेशी आणि कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही त्यामुळे त्याची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने काळे गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब आढाव यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपला कार्यक्रमास विरोध नव्हता तर त्या ठिकाणी आपला गट क्रं.२०४,२(३) हा असून हा आमचा वडिलोपार्जित क्षेत्र आहे.त्यात माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांचे काळात स्वामी समर्थ केंद्रास साधारण .०६ आर.खुले क्षेत्र (ओपन स्पेस ) दिले आहे.त्याठिकाणी अजून आपले .०३ आर क्षेत्र शिल्लक असून ते नेमके कोठे आहे तिची निश्चिती करा आणि मग कार्यक्रम करा अशी विनंती केली होती.शिवाय त्यांनी आपल्या जागेत पूर्व बाजूस फाटक टाकले असून दक्षिण बाजूचे सुरू असलेले फाटक अवैधरीत्या बंद केल्याचा आरोप केला आहे.शिवाय हा कार्यक्रम सरकारी होता तर त्या ठिकाणी सरकारी अधिकारी का आले नाही ? असा सवाल विचारला आहे.शिवाय त्या ठिकाणी हरिभाऊ गिरमे यांचे विरुद्ध अनेक महिलांचा आणि नागरिकांच्या तक्रारी आहे.त्यांना त्या पदावरून दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने हरिभाऊ गिरमे यांचेशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने नगरपरिषेतील विरोधी गटाच्या नेत्या गौरी मंदार पहाडे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”सदर काम हे आ.आशुतोष काळे यांनी,”महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा-अभियान योजनेतून ३७ लाख रुपये प्रशासक काळात मंजूर केले आहे.त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यात आणखी १० लाख रुपयांची भर घातली असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे या कार्यक्रमाचे भूमिपजन करण्याचा नैतिक अधिकार आ.आशुतोष काळे यांनाच आहे अन्य कोणालाही नाही असा दावा केला आहे.
दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने कार्यक्रम ज्या प्रभाग क्रं.०३ मध्ये संपन्न झाला त्या प्रभागाचे नगरसेवक जनार्दन कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,”आमचे प्रभागात कार्यक्रम असताना व कार्यक्रमास निधी आ.आशुतोष काळे यांचा असताना या कार्यक्रम पत्रिकेत केवळ नगराध्यक्ष पराग संधान व मुख्याधिकारी सुहास जगताप यांचे दोघांचे नावे होती आमचे कोणाचेही नाव नसल्याचा खुलासा करून नाराजी व्यक्त केली आहे.



