जाहिरात-9423439946
आंदोलन

…’त्या’ आरोपीस राजकीय अभय,संघटनेने केले आंदोलन !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात ग्रामसेवक महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी यासाठी आज राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेसह विविध तीन संघटनांनी आज कोपरगाव पंचायत समितीसमोर निषेध आंदोलन केले असून याची दखल न घेतल्यास आपण राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष नितीन धामणे आणि राज्य सचिव सचिव हरिचंद्र काळे,जिल्हाध्यक्ष सुनील राजपूत,तालुकाध्यक्ष जालिंदर पाडेकर,राजेंद्र बागल,सुरेश रहाणे आदींनी दिला आहे.त्यामुळे आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे ग्रामसेवक संघटनेचे लक्ष लागून राहिले आहे.

कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी.

दरम्यान आदल्या दिवशी हे प्रकरण गावातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून आरोपीने जाहीर माफी मागून मिटवण्याचा प्रयत्न केला होता.त्यात तो माफी मागण्यासाठी गावात येणार होता.मात्र त्याला नंतर पश्चिम गडावरून राजकीय अभय मिळाल्याने त्याने आपला बेत बदलला व तो माफी मागण्यास आपल्या घरी या असे बोलू लागला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आढळून आली आहे.

   या  बाबत सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला ही कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून गेली चार वर्षांपासून काम करत आहे.सरपंच यांचा कार्यकाळ संपल्यावर संबंधित आरोपी व माजी सरपंच हा काही ना काही कारण शोधून ग्रामपंचायत मध्ये येऊन बसत होता.घटनेच्या दिवशी दिनाक 12 फेब्रुवारीत रोजी तो आरोपी माजी सरपंच भोकरे हा काही एक काम नसताना दुपारी 4 वा चे सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात आला त्यावेळी सदर महिला कर्मचारी आपले सरकारी काम करत होत्या.त्यानंतर आरोपी इसम हा त्यांचेजवळ आला व कामकाजाचा विचारपुस करत करत तो त्यांचे जवळ  बराच वेळ बसला दुपारी 5 वा चे सुमारास महिला कर्मचारी या त्यांचे कार्यालयीन काम आटोपुन निघणार त्यावेळी आरोपीने त्यांना बसण्याचा आग्रह धरला.त्यावेळी विनयभंग केला असल्याचा आरोप त्यावर पोलिसांत नोंदवला गेला आहे.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देताना ग्रामसेवक संघटनेचे कार्यकर्ते.

दरम्यान याबाबत संबंधित आरोपी इसम हा त्याचा सरपंच पदाचा कालावधी संपूनही त्रास देण्याचे उद्देशाने येत होता व सातत्याने पाठलाग करत होता.तक्रारदार महिलेने आरोपीचा फोन ब्लॉक केला असता तो कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क करून त्रास देत होता.दुसऱ्या गावात त्या कर्तव्यावर असल्यावर सुद्धा त्याचा त्रास कमी होत नसल्याचे उघड झाले आहे.मात्र तो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची धमकी देऊन सदर कर्मचारी महिलेला एकतर्फी प्रेम करून ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

   दरम्यान या प्रकरणी संबंधित महिला ग्रामपंचायत अधिकारी यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 74 अन्वये गुन्हा क्रं 49/2026 प्रमाणे आरोपी माजी सरपंच याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक श्री कारखिले हे करीत असताना आज कोपरगाव येथील तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी आहेत.मात्र आरोपीला अद्याप अटक केली नसल्याचे उघड झाल्याने तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेसह ग्रामसेवक बी.एन.जी.136,ग्रामसेवक संघ आदींनी आज कोपरगाव पंचायत समिती समोर आज निषेध आंदोलन करून तालुका प्रशासनाला इशारा दिला आहे.

कोपरगाव तालुका पंचायत समितीसमोर आंदोलन करताना  ग्रामसेवक संघटनेचे कार्यकर्ते.

दरम्यान एका माहितीनुसार या घटनेबाबत संबंधित महिलेने याबाबत लोकप्रतिनिधी यांचे सदर घटनास्थळ परिसरातील सत्ताधारी गटाचे स्वीय सहाय्यक,गटविकास अधिकारी आदींना याबाबत कल्पना दिली असल्याची माहिती हाती आली आहे.मात्र काही मर्यादांमुळे त्यांना कारवाई करण्यास अडचण आली असल्याचे समजत आहे.त्याचा या आरोपी सरपंच याने गैरफायदा घेतला असल्याचे दिसून आले आहे.

  दरम्यान त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,”सदर इसम गेल्या दीड ते दोन वर्षांपासून फोनद्वारे देखील त्यांना त्रास देत होता,याबाबत संबंधित महिला ग्रामपंचायत अधिकारी यांनी वेळोवेळी कोपरगाव येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी यांना माहिती दिलेली होती असा गौप्यस्फोट केला आहे.तरीही अशी गंभीर घटना घडल्याने प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील महिला ग्रामपंचायत अधिकारी भयभीत झाल्या असून त्यांच्या मानसिक सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.कार्यस्थळी महिलांची सुरक्षा धोक्यात येणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे.

   सदर प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला असला तरी पीडितेला न्याय मिळण्यासाठी व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तात्काळ संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर व जलदगतीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी.पीडित महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यास शासकीय स्तरावर सुरक्षा प्रदान करावी.राज्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयात सीसीटीव्ही व सुरक्षा रक्षक नियुक्त करावेत. राज्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांसाठी महिला सुरक्षा प्रोटोकॉल लागू करावा.या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.महिला कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम 2013 ची प्रभावी अंमलबजावणी करावी.सदर घटना ही केवळ एका महिला अधिकाऱ्यावर झालेला अन्याय नसून संपूर्ण महिला कर्मचारी वर्गाच्या सन्मान व सुरक्षिततेवर झालेला घाला असल्याचा दावा केला आहे.त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ ठोस कारवाई करावी,अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेवटी दिला आहे.

   दरम्यान सदर निवेदनाच्या प्रति महिला आयोगाच्या अध्यक्षा,अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी,गट विकास अधिकारी संदीप दळवी आदींना दिल्या आहेत.

   दरम्यान आदल्या दिवशी हे प्रकरण गावातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून आरोपीने जाहीर माफी मागून मिटवण्याचा प्रयत्न केला होता.त्यात तो माफी मागण्यासाठी गावात येणार होता.मात्र त्याला नंतर पश्चिम गडावरून राजकीय अभय मिळाल्याने त्याने आपला बेत बदलला व तो माफी मागण्यास आपल्या घरी या असे बोलू लागला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आढळून आली आहे.त्यामुळे माफीचा बेत त्याने बदलला असल्याचे  बोलले जात आहे.राजकिय अभय मिळाल्याने त्याचेवर सरकारी कामात अडथळा आणल्याचे कलम वगळले असल्याचा आरोप संघटनेच्या कार्यकत्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close