आंदोलन
जीवावर उठले मोकाट जनावरे,उद्या आंदोलन !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न जीवघेणा बनला असून त्यावर जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला असून त्यावर कोपरगाव नगर परिषदेने त्वरित कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी शहरातील विविध संघटनांनी एकत्र येत बुधवार दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी,’ जनआक्रोश आंदोलन’ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.मात्र,प्रशासनाने त्याला केराची टोपली दाखवली असल्याचे बोलले जात आहे.परिणामी दोन निष्पाप कोपरगावकरांचे जीव हकनाक गेले आहे.या दोन मृत्यूंची आणि त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी कोण घेणार ? असा गंभीर सवाल निर्माण झाला आहे.
कोपरगाव शहरांमधील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे नागरिकांच्या जीवासाठी घातक ठरत आहेत.कोपरगावसह अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर बसणारी किंवा आपसात भिडणारी जनावरे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत.यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मुख्य रस्ते आणि वर्दळीच्या चौकांमध्ये जनावरे उभी राहतात.रात्रीच्या वेळी किंवा वळणावर मोकाट जनावरे न दिसल्याने वाहने आदळतात.रस्त्यावर जनावरे आपसात भिडल्याने अचानक शिमगा केल्याने पादचारी आणि दुचाकीस्वार जखमी होतात.संबंधित या जनावरांचे मालक दूध काढून झाल्यानंतर किंवा जुनी झालेली जनावरे मालक मोकाट सोडतात.परिणामी त्यामुळे अनेक नागरिकांना आपल्या जीवाला हकनाक मुकावे लागत आहे.त्याबाबत विविध संघटनांनी लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई होत नाही आणि झाली तर जुजबी कारवाई करून पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होत असल्याने आता नागरिकांचे संयमाचा बांध फुटला आहे.त्यामुळे आता उद्या दि.19 ऑगस्ट रोजी त्याबाबत निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसून येत आहे.त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी मुख्याधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्या दरबारात बोलावून कान उघडणी केली असल्याची बातमी हाती आली आहे.

दरम्यान याबाबत एक रंजक माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली असून त्यात,”कोपरगाव नगरपालिका गोशाळा बांधणार अशी घोषणा मोठे ढोल बडवून युवराजांचे उपस्थितीमध्ये केली होती.परंतु मोकाट जनावरे गोशाळांनी नाकारण्याचे मुख्य कारण वेगळे असल्याची माहिती समोर आली आहे.त्यात शहरातील मोकाट जनावरे हॉटेलची उष्ठावळ, कागद,खरकटे,प्रत्येक घरातील शिळे अन्न खातात.परिणामी त्यांची नैसर्गिक चारा अथवा गवत खाण्याची क्षमता नष्ट होत असल्याने ही जनावरे कालांतराने गो-शाळेत येथील वातावरण न मानवल्याने मृत्युमुखी पडत आहे.परिणामी गोवंश हत्येचे पातक गोशाळा चालकांवर येत असल्याने ते हे अरिष्ट टाळत असल्याची आतील माहिती आहे.त्यामुळे गोशाळेला जागा देऊनही फार काही पदरात पडण्याची शक्यता नसल्याची जोरदार चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे.
दरम्यान या जनआक्रोश आंदोलनात कोपरगाव शहरातील विविध सामाजिक संघटना,सार्वजनिक मंडळे,शाळा,महाविद्यालये तसेच नागरिकांनी पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती आ.काळे यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.त्यामुळे या ‘जनआक्रोश आंदोलनला ‘ मोठ्या संख्येने कोपरगावकर सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.शाळेत जाणारे विद्यार्थी,कामावर जाणारे नोकरदार,रोजंदारीवर काम करणारे मजूर तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना दररोज रस्त्यावरून ये-जा करताना मोकाट जनावरांची भीती वाटत असून कधी कोणते मोकाट जनावर अंगावर येईल याचा नेम राहिला नाही.रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असून,अपघाताचा धोका वाढला आहे.
दरम्यान मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.मात्र,प्रशासनाने त्याला केराची टोपली दाखवली असल्याचे बोलले जात आहे.परिणामी दोन निष्पाप कोपरगावकरांचे जीव हकनाक गेले आहे.या दोन मृत्यूंची आणि त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी कोण घेणार ? आणखी किती नागरिकांचा बळी गेल्यानंतर नगरपरिषद प्रशासन जागे होणार ? असा थेट सवाल उपस्थित करत कोपरगावकरांच्या वतीने ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात येणार आहे.



