विशेष दिन
जागतिक योग दिन उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देश विदेशातील भक्तगणात ध्यानधारणेचा प्रचार आणि प्रसार करणा-या कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाच्या आत्मा मालिक शैक्षणीक संकुलात आज तब्बल नऊ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन योग प्रात्यक्षिके सादर केली आहे.या आगळ्या वेगळ्या जागतिक योग दिनास आश्रमातील संत मंडळींनी हजेरी लावून ध्यान आणि योगाचे महत्व विषद केले असल्याची माहिती समोर आली आहे.

“योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे.योगाच्या माध्यमातून केवळ शरीर निरोगी राहत नाही,तर मन शांत,स्थिर आणि सकारात्मक बनते.नियमित योगाभ्यासामुळे जीवनात शिस्त,संयम आणि आत्मविश्वास वाढतो.प्रत्येकाने योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवायला हवे”-संत परमानंद महाराज,अध्यक्ष,आत्मा मालिक ध्यान योग मिशन.
दरवर्षी २१ जून रोजी जगभरात ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.योगाभ्यासाचे महत्त्व आणि त्याचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे याविषयी जगभरात जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.तो कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मालिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले,“योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर,मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे.आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने नियमित योगाभ्यास करून निरोगी व सकारात्मक जीवन जगणे काळाची गरज आहे.आत्मा मलिक संकुलात विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.आत्मा मालिक माऊलींच्या प्रेरणेने हा भव्य दिव्य जागतिक योगदिन उत्साहात संपन्न झाला.

दरम्यान आज भल्या सकाळी आत्मा मालिक शैक्षणीक संकुलाचे प्रशस्त मैदान योग साधनेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी गजबजून गेले.काही वेळातच आखीव रेखीव रांगा लावत विद्यार्थ्यांनी शिस्तबध्दपणे योग प्रात्यक्षिके सादर केली.योग प्रशिक्षक अजित पवार,रवींद्र नेद्रे आणि अनिकेत सुसरे यांनी प्राणायाम,ध्यान आणि विविध योगासने विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. “करा योग, रहा निरोगी” असा संदेश यावेळी देण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,ध्यान योग मिशनचे अध्यक्ष परमानंद महाराज,ब्रह्मांडानंद महाराज,प्रेमानंद महाराज,सेवादास महाराज,संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंत भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठल होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदीपकुमार भंडारी,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक,वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे,वसतिगृह व्यवस्थापिका मीरा पटेल,प्राचार्य निरंजन डांगे,संदीप गायकवाड,नामदेव डांगे,माणिक जाधव,नितीन सोनवणे,मीनाक्षी काकडे तसेच सी.ई.ओ.अशोक शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.



