क्रीडा विभाग
हॉकीत…या संघाचे पटकावले जिल्हा नेतृत्व !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
हॉकीच्या मैदानावर आपल्या विजयाची परंपरा कायम राखत सुरेगाव हद्दीत असलेल्या गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने जिल्हास्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करीत विजेतेपद पटकावले आहे.या विजयाच्या जोरावर गौतम पब्लिक स्कूलचा संघ आता जवाहरलाल नेहरू हॉकीच्या विभागीय स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

“गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे सातत्याने आयोजन करून ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो.यावर्षीही तालुका,जिल्हा,विभागीय व राज्यस्तरावर व्हॉलीबॉल,क्रिकेट,फुटबॉल आणि हॉकीच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.राज्यभरातून येणाऱ्या खेळाडूंना दर्जेदार क्रीडा मैदान,उत्तम निवास व भोजनाची सुविधा मिळावी,तसेच त्यांना स्पर्धेचा आनंद घेत गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी प्रयत्न असतो”- चैताली काळे,विश्वस्त,संस्था.
प्रवरा पब्लिक स्कूल,लोणी येथे प्रवरा पब्लिक स्कूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी आपल्या खेळातील कौशल्य,वेग,अचूक पासिंग,भक्कम बचाव आणि आक्रमक खेळाचे दर्शन घडवत आपला हॉकी खेळातील दबदबा कायम ठेवत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविले असल्याचे दिसून आले आहे.उपांत्य फेरीच्या सामन्यात गौतम पब्लिक स्कूल विरुद्ध प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल अशी लढत झाली. सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवलेल्या गौतमच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करण्याची संधी न देता ७–० अशा मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे.या लक्षवेधी विजयासह गौतमच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
अंतिम सामन्यात गौतम पब्लिक स्कूल विरुद्ध यश अकॅडमी,सोनई यांच्यात सामना रंगला होता.अंतिम सामन्याचा गौतमच्या खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळ करत २–० असा विजय मिळविला आहे.या विजयासह गौतम पब्लिक स्कूलने जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले आणि विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे.शाळेच्या हॉकी संघाने यापूर्वीही अनेक वेळा दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.त्यामुळे यंदाच्या जिल्हास्तरीय विजयानंतर विभागीय स्पर्धेतही गौतमच्या संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गौतम पब्लिक स्कूलमध्ये १५ व १६ सप्टेंबर २०२६ रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच जवाहरलाल नेहरू सब-ज्युनिअर व ज्युनिअर मुले तसेच मुली यांच्या विभागीय हॉकी स्पर्धा देखील गौतम पब्लिक स्कूलमध्येच होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.गौतम पब्लिक स्कूलच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ.अशोक काळे,संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे,सचिव चैताली काळे तसेच संस्थेच्या संचालक मंडळ,संस्था निरीक्षक नारायण बारे आदींनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान या यशाबद्दल प्राचार्य नूर शेख,हॉकी संघातील सर्व खेळाडू,प्रशिक्षक,क्रीडा विभाग प्रमुख रमेश पटारे,राजेंद्र आढाव,इसाक सय्यद,महेश गोंडे,क्रीडा शिक्षक,दोन्ही विभागांचे पर्यवेक्षक,हाऊस मास्टर्स,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय सब ज्युनिअर नेहरू हॉकी स्पर्धेमध्ये विजयी गौतम पब्लिक स्कूलच्या संघात समवेत प्राचार्य नूर शेख,रईसा शेख,बाळासाहेब अंबाडे प्राचार्य प्रवरा पब्लिक स्कूल,हॉकी कोच रमेश पटारे,इसाक सय्यद व खेळाडू.



