कोपरगाव शहर वृत्त
…या पालिकेची पाणी पट्टी होणार माफ,या नेत्याचे आश्वासन !

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासकीय काळात प्रलंबित राहिलेल्या पाणीपट्टीवरील दंड व विलंब शुल्काचा आर्थिक भार कमी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पालिकेने अडीच कोटी रुपयांची मूळ पाणीपट्टीची थकबाकी भरावी दंड आणि विलंब शुल्क माफ करण्याची कार्यवाही केली जाईल,असे आश्वासन अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले असल्याचा दावा नगराध्यक्ष पराग संधान यांनी केला आहे.त्यामुळे पालिकेवरील सुमारे आठ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार कमी होण्याची शक्यता असून,उपलब्ध होणारा निधी शहराच्या विकासकामांसाठी वापरता येणार असल्याचे म्हटले आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय काळात पाणीपट्टीची मोठी थकबाकी प्रलंबित राहिली आहे.त्यामध्ये सुमारे अडीच कोटी रुपये मूळ पाणीपट्टी,साडेतीन कोटी रुपये दंड आणि चार कोटी रुपये विलंब शुल्क,अशी एकूण सुमारे ११ कोटी रुपयांची रक्कम झाली आहे.वाढत्या दंड व विलंब शुल्कामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याने नागरिकांच्या हिताचा विचार करून त्यातून दिलासा मिळावा”- पराग संधान,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत नगराध्यक्ष पराग संधान यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या थकीत पाणीपट्टीचा प्रश्न मांडत दंड व विलंब शुल्कातून दिलासा देण्याची मागणी केली होती त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले आहे.

यावेळी नगराध्यक्ष संधान यांनी सांगितले की,प्रशासकीय काळात पाणीपट्टीची मोठी थकबाकी प्रलंबित राहिली आहे.त्यामध्ये सुमारे अडीच कोटी रुपये मूळ पाणीपट्टी,साडेतीन कोटी रुपये दंड आणि चार कोटी रुपये विलंब शुल्क,अशी एकूण सुमारे ११ कोटी रुपयांची रक्कम झाली आहे.वाढत्या दंड व विलंब शुल्कामुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीवर अतिरिक्त ताण निर्माण होत असल्याने नागरिकांच्या हिताचा विचार करून त्यातून दिलासा मिळावा असे म्हटले होते.
या मागणीला आ.विवेक कोल्हे यांनीही पाठिंबा देत थकीत रकमेवरील दंड व विलंब शुल्क माफ करण्याची भूमिका मांडली.त्यावर पालकमंत्री विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत,पालिकेने प्रथम अडीच कोटी रुपयांची मूळ थकबाकी भरावी.त्यावरील दंड व विलंब शुल्क माफ करण्याची कार्यवाही करण्यात येईल,अशी ग्वाही दिली.या निर्णयामुळे पालिकेचा मोठा आर्थिक भार कमी होऊन शहरातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे कोपरगावच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रशासकीय काळातील या आर्थिक प्रश्नावर नगराध्यक्ष पराग संधान यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत होता.त्यांच्या मागणीला पालकमंत्री विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.



