उद्योग विभाग
शिर्डी औद्योगिक वसाहतीचे दुसरे प्रवेशद्वार होणार -…यांची माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यातील नियोजित शिर्डी-सावळीविहीर औद्योगिक क्षेत्राचे (एमआयडीसी) उत्तर बाजूस मौजे सोनेवाडी येथे स्वतंत्र प्रवेशद्वार उभारण्याच्या आ.विवेक कोल्हे यांच्या मागणीला प्रशासकीय पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून,याबाबत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचा दावा या कार्यालयाने केला आहे.त्यामुळे सोनेवाडी येथे उत्तर प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीला आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

“शिर्डी औद्योगिक वसाहतीत कोपरगाव तालुक्याचे जास्त क्षेत्र असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयासही सादर करण्यात आले होते.सदर निवेदन संबंधित कार्यालयास प्राप्त झाले असून,आता प्रादेशिक अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करून त्याचा अहवाल मुख्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे”-विवेक कोल्हे,आमदार,विधानपरिषद.
राज्य विधानपरिषद सदस्य आ.विवेक कोल्हे यांनी दि.१८ मे रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे याबाबत पत्राद्वारे मागणी केली होती.या मागणीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री कार्यालयाकडून दि.१५ जून २०२६ रोजी संदर्भपत्र काढण्यात आले होते.त्यानंतर संबंधित निवेदनाची दखल घेत अहिल्यानगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नियोजित एमआयडीसीसाठी सोनेवाडी परिसरातील बहुतांश भूक्षेत्र संपादित करण्यात आलेले आहे.सध्या प्रस्तावित प्रवेशद्वार सावळीविहीर बाजूस असल्याने औद्योगिक क्षेत्रात ये-जा करणारी वाहतूक एकाच मार्गावर केंद्रित होण्याची शक्यता आहे.त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी,अपघातांचा धोका तसेच कामगार,उद्योजक आणि मालवाहतुकीसाठी वेळेचा अपव्यय होऊ शकतो.सोनेवाडी येथे उत्तर प्रवेशद्वार झाल्यास वाहतुकीचे विभाजन होऊन कोंडी कमी होण्यास मदत होईल.कामगार व उद्योजकांचा प्रवासाचा वेळ वाचेल,मालवाहतूक अधिक सुरळीत होईल,औद्योगिक उत्पादनाची कार्यक्षमता वाढेल.तसेच रुग्णवाहिका,अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांना औद्योगिक क्षेत्रात जलद पोहोचणे शक्य होणार आहे.
याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयासही सादर करण्यात आले होते.सदर निवेदन संबंधित कार्यालयास प्राप्त झाले असून,आता प्रादेशिक अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करून त्याचा अहवाल मुख्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यामुळे सोनेवाडी उत्तर प्रवेशद्वाराच्या मागणीमुळे कोपरगाव तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

