उद्योग जगत
…या तालुक्यात होणार पुन्हा स्मार्ट सिटी!

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय येथे संजीवनीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सदिच्छा भेट घेत कोपरगाव शहर व मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली असून धोत्रे येथील स्मार्ट सिटीचा आग्रह केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

“आपली ही भेट कोपरगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार असून जनतेच्या (?) अपेक्षा व विश्वासाला न्याय देण्यासाठी विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न आहे”-विवेक कोल्हे,अध्यक्ष,सहकार महर्षी कोल्हे कारखाना.
या भेटीदरम्यान धोत्रे,नाथगंगा,बापतरे,पुरणगाव आदी परिसरातील सुमारे ५००० एकर क्षेत्रावर प्रस्तावित असलेला आणि २०१९ पासून प्रलंबित असलेला स्मार्ट सिटी प्रकल्पासह संबंधित शेतकरी बांधवांच्या चार प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास तातडीने करारनामे प्रक्रिया सुरू होऊन विकासकामांना गती मिळणार असल्याचे विवेक कोल्हे यांनी नमूद केले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री यांचेशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचा दावा केला आहे.

“धोत्रे येथील स्मार्ट सिटी होऊ नये यासाठी आपण ६०० शेतकऱ्यांना घेऊन २०२३ साली लढा उभा करून त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.त्यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी देऊन शेतकऱ्यांचे संमती घेतल्याशिवाय या ठिकाणी कोणताही प्रकल्प होणार नाही असे लेखी दिले आहे.आणि आजही शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे”-पंडित शिंदे,शेतकरी नेते,प्रस्तावित स्मार्ट सिटी,धोत्रे.
यासह कोपरगाव शहरातील पाणीपुरवठा योजना,जलसिंचन प्रकल्प,रस्ते विकास,नागरी सुविधा आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांशी संबंधित प्रस्तावांवरही मुद्देसूद मांडणी करण्यात आली.स्थानिक नागरिकांच्या वाढत्या गरजा आणि शहराच्या दीर्घकालीन विकासाचा विचार करून शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

दरम्यान एका माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे पुन्हा स्मार्ट सिटी करण्याचे आदेश रस्ते विकास महामंडळास दिले असून त्याबाबत तातडीने अहवाल देण्यास संबंधित विभागाच्या सचिवास सांगितले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या माहितीचा उपयोग करून विवेक कोल्हे हे श्रेयवासाठी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगावच्या विकासात्मक प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत आवश्यक ते मार्गदर्शन केले व विकासकामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे.शासन व स्थानिक पातळीवरील समन्वय अधिक बळकट करून कोपरगावच्या प्रगतीला नवी दिशा देण्याचा निर्धार या भेटीतून अधोरेखित झाला.
दरम्यान धोत्रे येथील स्मार्ट सिटी होऊ नये यासाठी भाजपचे कार्यकर्ते पंडित शिंदे यांनी ६०० शेतकऱ्यांना घेऊन २०२३ साली लढा उभा केला होता.त्यांचे मत आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतले असता त्यांनी,”आम्ही धोत्रे येथील स्मार्ट सिटी विरुद्ध लढा उभा करून त्यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.त्यावेळी रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी देऊन शेतकऱ्यांचे संमती घेतल्याशिवाय या ठिकाणी कोणताही प्रकल्प होणार नाही असे लेखी दिले आहे.आणि आजही शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असून कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी पोळ्या भाजीत असेल तर आमचा त्यास कठोर विरोध करणार असल्याचा दावा पंडित शिंदे यांनी केला आहे.



