दळणवळण
समृद्धी महामार्गासाठी वापरण्यात आलेले रस्ते पूर्ववत करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होवून हा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.या समृद्धी महामार्गासाठी पूर्व भागातील अनेक गावातील ज्या रस्त्यांचा वापर करण्यात आला त्यापैकी खराब झालेले काही रस्ते अजूनही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून हे सर्व रस्ते पुन्हा पूर्ववत करून द्या अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे प्रमुख अधिकाऱ्यांकडे केली आहे.
“समृद्धीच्या पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने कोणत्याही अडचणी येणार नाही त्यासाठी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र चर खोदावे.शेतकऱ्यांच्या पाईप लाईन,सर्व्हिस रोड व खोदकाम केलेली शेती याबाबतच्या अडचणी दूर कराव्या.समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी डक्ट तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करा”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले.उद्घाटन केलेला मार्ग ५२० किमी लांबीचा असून तो नागपूर ते शिर्डीला जोडतो.शिर्डीला मुंबईशी जोडणारा भरवीर पर्यंतचा ८० कि.मी.चा उर्वरित कॉरिडॉर आता पूर्ण झाला असून त्याचे उदघाटन २६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला मात्र संलग्न रस्त्यांची कामे मात्र तशीच प्रलंबित आहेत त्या बाबत आ.काळे यांनी नुकताच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवाज उठवला आहे त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,संचालक शिवाजी शेळके,माजी संचालक सुदाम लोंढे,गौतम बँकेचे संचालक विजय रक्ताटे,शरद पवार पतसंस्थेचे संचालक व्यंकटेश बारहाते,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब बारहाते,भोजडेचे सरपंच सुधाकर वादे,कोकमठाणचे उपसरपंच अरविंद रक्ताटे,एम.एस.आर.डी.सी.चे विश्वनाथ सातपुते,सचिन भोईटे,राज कन्स्ट्रक्शन्सचे अभियंता सुमेध वैद्य आदींसह संवत्सर,कोकमठाण,धोत्रे,भोजडे,खोपडी,लौकी आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांना ज्या ठिकाणी पार करून जात आहे त्या ठिकाणी अनेक लहान-मोठ्या पुलांची निर्मिती झाली आहे.त्या ठिकाणी जुना रस्ता व पुलांची उंची यामध्ये तफावत असल्यामुळे पावसाचे पाणी साचण्याची शक्यता आहे.या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने कोणत्याही अडचणी येणार नाही त्यासाठी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र चर खोदावे.व्यक्तिगत अडचणी असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाईप लाईन,सर्व्हिस रोड व खोदकाम केलेली शेती याबाबतच्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी डक्ट तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करा. पावसाळ्याचा विचार करून डक्ट, लहान-मोठे पूल व पर्यायी रस्त्यावरून वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाय योजना करा व नागरिकांनी ज्या अडचणी मांडल्या त्या अडचणी लवकरात लवकर दूर करा अशा सूचना त्यांनी शेवटी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.