धार्मिक
प्रत्येक कर्म ईश्वराला साक्षी मानून करणे हीच खरी भक्ती-मिरिकर

न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
“भक्ती म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे तर प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे आणि ईश्वराला साक्षी मानून करणे होय.भक्तीने मन शुद्ध होते आणि सत्कर्मानी जीवन सुंदर होते.माणसांचे कर्म शुद्ध असेल,तर जीवनात समाधान नक्कीच येत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“ज्ञानेश्वरीतील कर्मयोग केवळ स्वतःच्या कल्याणापुरता मर्यादित नाही.ज्ञानी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तीने समाजाच्या हितासाठीही कार्य करावे.आपल्या आचरणातून इतरांना योग्य मार्ग दाखवावा,हा लोकसंग्रहाचा विचार कर्मयोगात महत्त्वाचा आहे.ज्ञानेश्वरीतील कर्मयोग म्हणजे संसार सोडून जाणे नव्हे,तर संसारातील कर्तव्ये निःस्वार्थपणे,समत्वबुद्धीने आणि ईश्वरार्पण भावनेने पार पाडणे होय”-वेदांताचार्य ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के,श्री क्षेत्र नेवासा.
भाद्रपद महिना हा व्रतवैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो.या महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व असते.घराघरात गणरायाची प्राणप्रतिष्ठा झालेली असते.त्यानंतरचा दिवस म्हणजे पंचमी.ही पंचमी ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी होय.आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महान ऋषी होवून गेले आहेत त्यांनी लावलेले शोध आणि त्यांचे कार्य यामुळे आपले जीवन सुखमय झालेले आहे.या ऋषींच्या स्मृतीप्रीत्यर्थ ऋषीपंचमीचे व्रत केले जाते.ऋषीमुनींचे अंशतः अनुकरण करण्यासाठी व्रताच्या दिवशी विविध कंदमुळे,फळे खाल्ली जातात.त्याचबरोबर शास्त्रानुसार ऋषीपंचमीचे व्रत करतात.संवत्सर येथे दर वर्षी या दिवशी ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांचे हरी कीर्तन आयोजित करण्याची परंपरा गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष स्व.नामदेवराव परजणे यांनी शनी मंदिरासमोर सुरू केली होती.ती आजतागायत सुरू आहे.यावेळी त्या बोलत होत्या.

सदर प्रसंगी नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक व विश्वस्त वेदांताचार्य ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के,आ.आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,”या जगात ज्याच्याकडे समाधान आहे,तो खरा श्रीमंत आहे.प्रेम,श्रद्धा आणि समर्पणाने केलेली भक्ती मनाला शांती व जीवनाला दिशा देते.ज्ञानेश्वरीतील भक्तियोग हा सर्वसामान्य माणसालाही सहज आचरणात आणता येईल,असा प्रेममय मार्ग आहे.मानवी जन्म अमूल्य आहे.पैसा,संपत्ती आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवता येते;पण गेलेला वेळ परत येत नाही.म्हणून प्रत्येक क्षण सत्कर्म,नामस्मरण आणि परोपकारासाठी उपयोगात आणावा.जन्माला येताना माणूस काही घेऊन येत नाही आणि जाताना काही घेऊन जात नाही.मात्र त्याने केलेली सत्कर्मे,दिलेले प्रेम आणि केलेली सेवा यांची आठवण समाजाच्या मनात कायम राहते.देव मंदिरात शोधण्यापूर्वी माणसाच्या अंतःकरणात शोधा.भुकेल्याला अन्न,तहानलेल्याला पाणी आणि दुःखी माणसाला आधार देणे,हीच खरी ईश्वरसेवा आहे.भक्ती म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे तर प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे आणि ईश्वराला साक्षी मानून करणे होय.भक्तीने मन शुद्ध होते आणि सत्कर्मानी जीवन सुंदर होते.माणसांचे कर्म शुद्ध असेल,तर जीवनात समाधान नक्कीच येत असल्याचेही मीराबाई यांनी शेवटी सांगितले आहे.

यावेळी वेदांताचार्य ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,”संतांची संगत असेल तर जीवनाला दिशा मिळतेच.संतविचार मनात रुजले की वाईट सवयी दूर होतात,विवेक जागृत होतो आणि भक्तीचा मार्ग सुकर तर होतोच,परंतु भक्ती,सदाचार,आत्मचिंतन आणि जीवनमूल्यांची प्रेरणा त्यातून मिळते.आपल्या आचरणातून इतरांना योग्य मार्ग दाखवावा,हा लोकसंग्रहाचा विचार कर्मयोगात महत्त्वाचा आहे.ज्ञानेश्वरीतील कर्मयोग म्हणजे संसार सोडून जाणे नव्हे,तर संसारातील कर्तव्ये निःस्वार्थपणे,समत्वबुद्धीने आणि ईश्वरार्पण भावनेने पार पाडणे होय.संत ज्ञानेश्वर महाराजांनी कर्माला ज्ञानाची दिशा,भक्तीची जोड आणि सदाचाराचा आधार दिला तर आहेच,परंतु आत्मा हा नित्य,शुद्ध,बुद्ध आणि मुक्त असल्याचे देखील संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे.शरीर नश्वर असले तरी आत्मतत्त्व अविनाशी आहे.वेदाभ्यासाचा खरा उपयोग म्हणजे या आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करणे.धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी,तिला नीती व तत्वज्ञानाची जोड दिली तर आसक्तीपासून माणूस दूर जातो.अनासक्त माणसांनी लोकोध्दाराच्या कार्यात समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे हीच शिकवण वारकरी सांप्रदायाने आपल्याला दिलेली आहे.देव मंदिरात शोधण्यापूर्वी माणसाच्या अंतःकरणात शोधा.भुकेल्याला अन्न,तहानलेल्याला पाणी आणि दुःखी माणसाला आधार देणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे.म्हणून हा सांप्रदाय प्रत्येकाने अंगिकारण्याची आवश्यकता असल्याचेही ह.भ.प.म्हस्के महाराज यांनी शेवटी सांगितले आहे.

दरम्यान यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ह.भ.प.मीराबाई मिरीकर व वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे.ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.यंदा गोदावरीतून पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता.त्यातच किर्तन श्रवणाचा लाभ मिळत असल्याने छ.संभाजीनगर,नाशिक,अहिल्यानगर अशा विविध ठिकाणावरुन भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली आहे.या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.



