कोपरगाव तालुका
पंढरपुरात भिंत कोसळली,भाविक बेपत्ता !
जनशक्ती न्यूजसेवा
पंढरपूर-(प्रतिनिधी)
पंढरपूरात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंढरीत हाहाकार उडाला आहे. चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत दुपारी अडीच वाजता कोसळली. या घटनेत सहा जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पावसामुळे या भिंतीच्या आडोशाला काही लोक उभे होते. यामुळे मोठ्या संख्येने भाविक या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.यात विशेष करून काठावर भीक मागणारे भिकारी या भिंतीच्या आडोशाला उभे असल्याची माहिती आहे.
भिंत कोसळल्याने त्याचा मोठा आक्रोश सुरू झाला होता. नक्की ढिगाऱ्याखाली किती लोक दाबले गेले याची चिंता असून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर हे जे.सी.बी. व रुग्णवाहिकेसह घटनास्थळी रवाना झाले आहेत.शहराच्या विविध भागातून उपनगरातून आजच्या पावसाने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून पावासाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील राजवाड्याचा बुरूज ढासळला. वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला होता.
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पंढरपूर तालुक्याला झोडपले आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झाले असून टाकळी, कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.या अस्मानी संकटाने भाविकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.