कोपरगाव तालुका
ग्रामस्वच्छतेचा मंत्र देणारे आधुनिक गाडगेबाबा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हातात खराटे,फावडी,घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतरतो आणि गावाची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करू लागतो.ऐरवी गावाला परिचीत नसलेल्या या अवलियाचे लोकांना अप्रुप वाटते.लोकही त्यांच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होतात. काही तासात गावातील काना-कोपरा चकाचक झालेला असतो.ही किमया करणारा अवलिया आहे हरिभाऊ ज्ञानोबा उगले.
हरिभाऊ उगले हे ग्रामस्वच्छतेबरोबर गावा-गावांमध्ये सुरू असलेल्या किर्तन सप्ताह,विवाह सोहळ्यात पंगतीत गळ्यात पाटी अडकवून अन्न वाया न जाऊ देण्याचा संदेश हरिभाऊ देतात. ‘जेवढे बसेल पोटात,तेवढेच घ्या ताटात’, ‘महिने लागतात पिकवायला आणि मिनीट लागतो फेकायला’ अशा घोषवाक्याच्या पाट्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात.
अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेल्या हरिभाऊ ज्ञानोबा उगले यांनी संत गाडगेबाबांना आदर्श मानत ग्रामस्वच्छेतेचा वसा घेतला असून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील एक हजार खेड्यांना भेटी देत तेथे स्वच्छता केली आहे.उत्तर महाराष्ट्र,विदर्भ व मराठवाड्यातील अनेक खेड्यांमध्ये एक रात्र मुक्काम करून त्यांनी ग्रामस्वच्छता करून घेतली आहे.ग्रामस्थ,पदाधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगितले आहे.जनजागृती केली आहे.हरिभाऊ उगले यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांना नैतिक पाठबळ लाभले आहे.डोंगरगाव शिवारात हरिभाऊंची सहा एकर बागायती शेती आहे. दूधाचा जोडधंदा आहे.त्यांचा गुरांचा गोठा अतिशय स्वच्छ असतो.आदर्श गोठा म्हणून पंचक्रोशीतील नागरिक गोठा पहाण्यास आवर्जून भेट देत असतात.
दूचाकी मोटारसायकलने ते महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यात,वाड्या-वस्त्यांवर जातात.तेथे ग्रामपंचायत,मंदीर,शेतात किंवा मिळेल त्या मोकळ्या जागेत मुक्काम करतात.गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेल्या भोजनाचा आस्वाद घेत ते ग्रामस्वच्छेतेचे काम अविरतपणे करत आहेत.हरिभाऊ या नावाने ते परिचित झाले आहेत.हरिभाऊंच्या स्वच्छतेचा पुरावा काय म्हणता येईल तर हजारोच्या वर ग्रामपंचायतीनी त्यांना दिलेले प्रशस्तीपत्रक आहे.प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामधील छायाचित्र ही त्यांच्या मोबाईलमध्ये संग्रहित आहेत.‘ग्रामस्वच्छतेचा मूलमंत्र,आरोग्य आणि समृध्दी एकत्र’, ‘आपली स्वच्छता आपल्या हाती,मिळेल आजारातून मुक्ती’अशा विविध प्रेरक घोषवाक्यांच्या पाट्या तयार करून ते जनजागृती करतात.
हरिभाऊ उगले हे ग्रामस्वच्छतेबरोबर गावा-गावांमध्ये सुरू असलेल्या किर्तन सप्ताह,विवाह सोहळ्यात पंगतीत गळ्यात पाटी अडकवून अन्न वाया न जाऊ देण्याचा संदेश हरिभाऊ देतात. ‘जेवढे बसेल पोटात,तेवढेच घ्या ताटात’, ‘महिने लागतात पिकवायला आणि मिनीट लागतो फेकायला’ अशा घोषवाक्याच्या पाट्या उपस्थितांचे लक्ष वेधून घेतात.
हरिभाऊंना नदी स्वच्छतेविषयी ही तळमळ आहे.डोंगरगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत एक कांतिक्रारी ठराव केला आहे.गावात मृत्यूमुखी पडणाऱ्या व्यक्तींचा अंत्यविधी शेतात करणाऱ्या कुटूंबाची वर्षभराची घरपट्टी हरीभाऊ स्वतः भरणार आहेत.हरिभाऊंच्या मनात अंधश्रध्देला थारा नाही.ओसाड,उजाड पडलेल्या स्मशानभूमींची हरिभाऊ स्वच्छता करतात.
बोलता-बोलता हरिभाऊ सामाजिक वास्तवावर मार्मिक भाष्य करतात.ते म्हणतात, “खेड्या-पाड्यातील तरूणाई व्यसनांच्या विळख्यात अडकून गेली आहे. मुलींचे घरून पळून जाण्याचं प्रमाण वाढले आहे.आज गावा-गावात ३० ते ३५ वय वर्ष ओलांडलेले असंख्य तरूणांचे विवाह झालेले नाहीत.पूर्वीही गावांमध्ये उत्सव,सप्ताह,जत्रा गुण्यागोविंदाने,आनंदाने आयोजित केले जात होते.आज मात्र याला बीभत्स,धांगडधिंग्याचे स्वरूप आले आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चार ते पाच गोण्या भरतील एवढ्या दारूच्या बाटल्यांचा कचरा निघतो.आजच्या समाजाला संत व महापुरुषांच्या विचारांची शिकवण नव्यानं देण्याची गरज निर्माण झाली आहे.”
हरिभाऊ संपर्क क्रमांक-९८८१२१८७०६.
लेखन-सुरेश पाटील,शिर्डी