शैक्षणिक
…या गरजू विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक मदत !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना कोपरगाव येथील ‘हेल्पिंग हँड्स’ या स्वंयसेवी संस्थेमार्फत उच्च शिक्षणाकरीता आर्थिक मदत अनेक वर्षांपासून दिली जात असून यावर्षी धनादेश वाटपाचा कार्यक्रम व विद्यार्थ्यांचा सत्कार आगामी रविवार दि.९ ऑगस्ट २०२६ रोजी कोपरगाव,संभाजी महाराज चौक येथील ‘कृष्णाई बँकवेट हॉल’येथे सकाळी १०.३० वाजता जी.एस.टी.चे सेवानिवृत्त आयुक्त चंद्रकांत मंचरे यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व सरकारी लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“कोपरगाव तालुका आणि परिसरातील महाविद्यालयातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा शालेय शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य,फी भरण्यासाठी मदत अर्ज आणि प्रोत्साहन दिले जाते.आमची संस्था मानवता,सहकार्य आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने विविध लोकउपयोगी उपक्रम राबवत आहे”-दत्तात्रय खेमनर,लेखा परीक्षक व संस्थापक,’हेल्पिंग हँड्स’ कोपरगाव..
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ‘हेल्पिंग हँड्स’ ही एक सामाजिक व परोपकारी स्वंयसेवी संस्था आहे,जी प्रामुख्याने समाजातील गरजू,गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच इतर सामाजिक कार्यासाठी आर्थिक व शैक्षणिक मदत पुरवण्याचे काम करते.गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा शालेय शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य,फी भरण्यासाठी मदत अर्ज आणि प्रोत्साहन दिले जाते.ही संस्था मानवता,सहकार्य आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने विविध लोकउपयोगी उपक्रम राबवते.दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यातून ही संस्था समाजोपयोगी कामे पूर्ण करते.यासाठी कोपरगाव येथील बँक खात्याद्वारे देणगी स्वीकारली जात असून समाजातील गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम करत आहे.

या वर्षीही त्यांनी या उपक्रम कोपरगाव शहरातील संभाजी महाराज चौक येथील,’कृष्णाई बँकवेट हॉल’ येथे राबविण्याचे ठेवले असून त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जी.एस.टी.चे सेवानिवृत आयुक्त चंद्रकांत मंचरे यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.टी.सरोदे हे राहणार आहेत.
दरम्यान या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय खेमनर,भाऊ थोरात,विठ्ठलराव शिंदे,प्रा.अविनाश घैसास,डॉ.गोवर्धन हुसळे,प्रा.डॉ.भाऊसाहेब निघोट,मनोज जोशी,कु.नम्रता लोहिया,अ.नगर येथील आप्पासाहेब शिंदे,किशोर नन्नवरे,आण्णासाहेब बावके,प्रा.डॉ.गणेश देशमुख,श्री.मरिवजा सर,श्रीनिवास खरवंडीकर,डॉ.विलास आवारी,डॉ.संदिप शेळके,शिर्डी भाऊसाहेब पवार,गणेश सोनवणे,शरद गोर्डे,राजेंद्र गुमर,अमोल चिंतामणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



