न्यायिक वृत्त
….’त्या’ दोन आरोपींना सशर्त पन्नास हजारांचा जामीन मंजूर!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारी ग्रामपंचायत हद्दीत किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीच्या गुन्ह्यातील आरोपी शुभम बद्रीनाथ सांगळे आणि अभिजित बद्रीनाथ सांगळे दोन आरोपींना प्रत्येकी 50 हजारांचा जामीन मंजूर करून त्यांची दिवाणी न्यायाधीश वर्ग एकचे न्या.साठे यांनी सशर्त सुटका केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मात्र त्यांना पोलीस ठाण्यात दर सोमवारी हजेरी देणे बंधनकारक केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

“जामीन अर्जाच्या टप्प्यावर पुराव्यांची सविस्तर छाननी करून खोटे आरोप आहेत की नाहीत हे ठरवणे अपेक्षित नसते.खटला स्वतःच्या मार्गाने चालेल,पुराव्यांशी छेडछाड किंवा साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता कठोर अटींद्वारे रोखता येईल,असे कोपरगाव येथील कनिष्ठ न्यायालयाचे मत होते.”जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे” हे तत्त्व अधोरेखित करत न्यायालयाने आरोपीं शुभम बद्रीनाथ सांगळे आणि अभिजित बद्रीनाथ सांगळे जामीन मंजूर केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतसे राजकीय वातावरण तापत चालले असून कुरघोड्यांचे राजकारणास ऊत येत चालला आहे.कोपरगाव तालुका याला अपवाद नाही.या उचापतीना ऊत येणे स्वाभाविक मानले जात आहे.कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत असलेल्या सोनारी ग्रामपंचायत हद्दीत धारणगाव रोडवर नुकतीच दोन गटात,” तू,मला हाड का म्हणाला” या कारणावरून दिनांक 30 सप्टेबर रोजी चांगलीच मारहाण झाली असून यातील फिर्यादीचा भाऊ माधव दगडू सांगळे यांनी विनोद दगडू सांगळे (वय-44 ) या आपल्या भावाला लोखंडी रॉड,दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४४६/२०२६ अन्वये दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात सरपंच महिलेचे पुत्र शुभम बद्रीनाथ सांगळे आणि अभिजित बद्रीनाथ सांगळे या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता.त्याबाबत कोपरगाव येथील कनिष्ठ न्यायालय वर्ग 01 यांचे न्या.साठे यांचे न्यायालयात याबाबत सुनावणी संपन्न झाली आहे.त्यात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांचा सशर्त जामीन अर्ज मंजूर केला आहे.

या सुनावणीत त्यांनी फिर्यादीत नमूद केलेले आरोप खोटे आणि बनावट असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.जखमी व्यक्ती रुग्णालयातून सुटी मिळून घरी गेली असून,गंभीर जखमा झाल्याचे दाखवणारे वैद्यकीय प्रमाणपत्र रेकॉर्डवर नसल्याचेही न्यायालयाचे निदर्शनात आणून दिले आहे.आरोपीने न्यायालयाने घातलेल्या कोणत्याही अटींचे पालन करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.सरकारी पक्षाने (सहाय्यक सरकारी वकील) जामीन अर्जाला विरोध केला होता अशी माहिती हाती आली आहे.त्यात त्यांनी गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून,आरोपी जामिनावर सुटल्यास पुन्हा गुन्हा करण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता.दरम्यान यात आरोपींच्या वतीने ॲड.जयंत जोशी आणि ॲड.संकेत जानी यांनी काम पाहिले आहे.
दरम्यान यात न्यायालयाने नमूद केले की,”जामीन अर्जाच्या टप्प्यावर पुराव्यांची सविस्तर छाननी करून खोटे आरोप आहेत की नाहीत हे ठरवणे अपेक्षित नसते.खटला स्वतःच्या मार्गाने चालेल,पुराव्यांशी छेडछाड किंवा साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता कठोर अटींद्वारे रोखता येईल,असे न्यायालयाचे मत होते.”जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे” हे तत्त्व अधोरेखित करत न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान यात न्यायालयाने जामिनासाठी काही अटी घातल्या असून त्यात प्रत्येकी ५० हजार रुपयांचे जामीनपत्र कायमचा व तात्पुरता निवासी पत्ता न्यायालयात सादर करणे कायमचा मोबाईल क्रमांक व ईमेल (असल्यास) देणे,तीन जवळच्या नातेवाईकांचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड सादर करणे,साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव न आणणे,पुन्हा असा गुन्हा न करणे,आरोपी क्र.१ व २ यांनी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर सोमवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजेरी लावणे आदी अटी घातल्या असल्याचे निदर्शनास आणले आहे.या सुनावणीकडे कोपरगाव तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.



