जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

.. हि मिरची पीक ठरू शकते शेतकऱ्यांच्या प्रगतीचे साधन-आवाहन

न्यूजसेवा

कोपरगांव -(प्रतिनिधी)

  वर्तमानात शेतीचा वाढता उत्पादन खर्च,अनिश्चित बाजारभाव आणि पारंपरिक पिकांमधून घटणारे उत्पन्न या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता पीक विविधीकरणाचा स्वीकार करून प्रीमियम बाजारपेठ असलेल्या ब्याडगी मिरची सारख्या पिकांकडे वळण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन अश्वमेध ग्रुपचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी नुकतेच केले आहे.

“मुख्य खरीप पीक ऑक्टोबरमध्ये काढणीला येत असताना ब्याडगी मिरचीची लाल फळे नोव्हेंबरपासून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने काढणीस येतात.त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आणि अधिक मूल्याचे उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होते.अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रीमियम बाजारपेठ असलेल्या या पिकाचा अभ्यास करून प्रयोगशील दृष्टीकोन स्वीकारावा आणि शेतीचे अर्थकारण सक्षम करण्यासाठी पीक विविधीकरणाचा मार्ग अवलंबावा”-डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे,अध्यक्ष,अश्वमेध ग्रुप,कोपरगाव.


   शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पीक विविधीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.यामुळे एकाच पिकावरील अवलंबित्व कमी होते आणि शेती शाश्वत व फायदेशीर बनते.पीक विविधीकरणाचे प्रमुख फायदे हे आर्थिक स्थिरता येऊन जोखीम कमी होते.एका पिकाचे बाजारात भाव पडल्यास किंवा नुकसान झाल्यास,दुसऱ्या पिकातून (उदा.फळे,भाजीपाला,डाळी) मिळणारे उत्पन्न शेतकऱ्याला आर्थिक आधार देते.वर्षानुवर्षे एकच पीक घेतल्याने जमिनीतील विशिष्ट पोषकद्रव्ये कमी होतात.विविध पिके किंवा पिक फेरपालट केल्याने जमिनीचे आरोग्य सुधारत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आज राज्यातील अनेक शेतकरी ५ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जाणाऱ्या पिकांची लागवड करतात.उत्पादन चांगले असूनही बाजारभाव कमी असल्यामुळे शेतीतून अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नाही.याउलट कर्नाटक,गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यांतील अनेक शेतकरी प्रीमियम मूल्य असलेल्या पिकांची लागवड करून शेती अधिक फायदेशीर बनवत आहेत.कर्नाटकातील ब्याडगी मिरची लागवडीचे मॉडेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते.तेथील अनेक शेतकरी कापूस,सोयाबीन व इतर खरीप पिकांसोबत ब्याडगी मिरचीचे आंतरपीक घेतात.या पद्धतीमुळे मुख्य पीक वाढत असतानाच मिरचीचे उत्पादन सुरू होते आणि शेतकऱ्यांना एकाच हंगामात अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो.ब्याडगी मिरची ही कर्नाटकातील भौगोलिक मानांकन (जी.आय.टॅग) प्राप्त प्रसिद्ध मिरची असून तिचा आकर्षक गडद लाल रंग,कमी तिखटपणा आणि मसाला उद्योगातील मोठी मागणी यामुळे देशांतर्गत तसेच निर्यात बाजारात तिला विशेष स्थान आहे.जुलै ते ऑगस्ट महिन्यात ३० ते ३५ दिवसांची रोपे कापूस,सोयाबीन तसेच डाळिंबासारख्या फळबागांमध्ये योग्य अंतर राखून आंतरपीक म्हणून लागवड करता येते.योग्य व्यवस्थापन केल्यास आंतरपिकातून प्रति एकर सुमारे ५ ते १० क्विंटल सुक्या मिरचीचे उत्पादन मिळू शकते.ब्याडगी मिरचीचे बाजारभाव गुणवत्ता,मागणी व हंगामानुसार बदलत असतात.काही बाजारपेठांमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या मिरचीला ₹५०० ते ₹६०० प्रति किलोपर्यंत दर मिळाल्याची उदाहरणे उपलब्ध आहेत. मात्र प्रत्यक्ष बाजारभाव गुणवत्ता,पुरवठा आणि मागणी यानुसार कमी-अधिक होऊ शकतात.त्यामुळे लागवडीपूर्वी बाजारपेठेचा अभ्यास करून नियोजन करणे आवश्यक आहे.
यावर्षी पावसाच्या उशिरामुळे खरीप पिकांची वाढ काही प्रमाणात विलंबाने झाली आहे.त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही आंतरपीक घेण्याची संधी आहे त्यांनी ब्याडगी मिरचीचा गांभीर्याने विचार करावा,असे आवाहन त्यांनी केले.

   मुख्य खरीप पीक ऑक्टोबरमध्ये काढणीला येत असताना ब्याडगी मिरचीची लाल फळे नोव्हेंबरपासून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत टप्प्याटप्प्याने काढणीस येतात.त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आणि अधिक मूल्याचे उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होते.अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रीमियम बाजारपेठ असलेल्या या पिकाचा अभ्यास करून प्रयोगशील दृष्टीकोन स्वीकारावा आणि शेतीचे अर्थकारण सक्षम करण्यासाठी पीक विविधीकरणाचा मार्ग अवलंबावा,असे आवाहन डॉ. वाघचौरे यांनी केले आहे.ब्याडगी मिरचीची लागवड, रोपांची उपलब्धता,आंतरपीक नियोजन,तांत्रिक मार्गदर्शन तसेच बाजारपेठेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अश्वमेध ग्रुपशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ.वाघचौरे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close