महसूल विभाग
जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामसंवाद संपन्न,प्रश्न मार्गी लागतील !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शासकीय विभागांशी समन्वय साधून जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील तसेच उपलब्ध विकासनिधी व तांत्रिक बाबींचा विचार करून गावातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील एका कार्यक्रमांत बोलताना केले आहे.दरम्यान यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसंवाद साधला असला तरी गाव आणि परिसरातील प्रश्न मार्गी लागणार का असा सवाल निर्माण झाला आहे.

अंजनापूर व परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निळवंडे प्रकल्प,गोदावरी कालवा व उजनी उपसा जलसिंचन योजनेचा मोठा फायदा होत आहे.भाविकांमुळे सावळीविहीर ते कोल्हार मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी झगडे फाटा ते तळेगाव दिघे राज्य मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे.राज्य शासनाकडून वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने मार्गी लावावे. तसेच गावातील रस्ते,वीज जोडणी व महावितरणच्या प्रलंबित समस्या प्रशासनाने तातडीने सोडवाव्यात-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला आहे यावेळी आ.आशुतोष काळे,अपर जिल्हाधिकारी डॉ.बाळासाहेब कोळेकर,उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,तहसीलदार महेश सावंत,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी,अंजनापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता गव्हाणे व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना डॉ.पंकज आशिया म्हणाले की,”गावांतर्गत रस्ते तसेच कोपरगाव-संगमनेर रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही केली जाईल.महावितरणच्या रोहित्रांबाबत वारंवार उद्भवणाऱ्या समस्या तसेच पाणीवाटपाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महसूल प्रशासन सकारात्मक आहे.गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार गावात एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण केवळ सातशे ते आठशे इतके असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून,ग्रामपंचायत व प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा विलगीकरण अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावे,अशा सूचना त्यांनी दिल्या.गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा तसेच दर्जेदार मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचे चर्चेतून समोर आले. या समस्येच्या निराकरणासाठी दूरसंचार विभागाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवून मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील.तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विशेष शिबिरे आयोजित करून आधार कार्ड अद्ययावतीकरण,शिधापत्रिका व आयुष्मान भारत योजनेशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.या बैठकीत रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधांवर प्रामुख्याने चर्चा झाली.यावेळी सूत्रसंचालन ॲड.रमेश गव्हाणे यांनी केले तर प्रास्ताविक कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे.



