जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

नगरपरिषद प्रशासकीय इमारतीला मुहूर्त केव्हा ? नागरिकांचा सवाल !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
   
   कोपरगाव नगरपरिषद जुनी इमारत पाडून जवळपास नऊ वर्षे उलटून गेली आहेत मात्र 4.19 कोटी रुपयांची नवीन इमारत पूर्ण होऊन त्याचे उद्घाटन अद्याप दृष्टिपथात दिसत नसल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून नवीन इमारतीचे उद्घाटन होणार केव्हा असा सवाल कोपरगाव शहरातील नागरिकांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

कोपरगाव नगरपरिषद इमारत अद्याप पूर्ण झाली नसल्याने तिचे उद्घाटन झालेले नाही.

“आपण आगामी काळात निधी मिळवून अग्नी सुरक्षेसह काम लवकर पूर्ण करून इमारतीचे उद्घाटन करणार आहे.तथापि यासाठी जवळपास एक वर्षाचा कालखंड लागू शकतो”-पराग संधान, अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

   कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक दि.20 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाली आहे.त्यात भाजप कोल्हे गटास 19 जागा तर काळे गटास 1 जागा तर शिवसेना बंडखोर गटास 04 जागा प्राप्त झाल्या आहेत.आता स्वप्न रंजन संपून आता खऱ्या अर्थाने त्यांचा विकास रथाची चाके सुरू झाली आहे.त्यातच 03 फेब्रुवारी रोजी स्थायी समितीची पहिलीच बैठक नगराध्यक्ष पराग संघान यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.त्यात त्यांनी शहरातील महिलाना निवडणुकीत आश्वासन दिल्या प्रमाणे आज स्वच्छता गृह बांधण्यासाठीची तरतूद 0.50 कोटी लाख रुपयांवरून वाढवून 01 कोटी तर शाळांची दुरावस्था दूर करण्यासाठी 0.50 कोटी रुपयांवरून 01 कोटी तर शहरातील विविध बागांचे सुशोभीकरण कारणासाठी 01 कोटींची तर आपत्ती व्यवस्थापना तथा शहराचे आरोग्य आणि रोगराई निर्मूलन आदीसाठी 0.60 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे तर उर्वरित कामासाठी नवीन नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कालच दुसरी सर्वसाधारण सभा सकाळी 11.30 वाजता (पत्रकारांना टाळून) घेतली असून त्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.त्यात सर्वसंमतीने सर्व विषय संमत झाले असल्याची माहिती आली आहे.मात्र नगरपरिषद इमारतीबाबत कोणतीही चर्चा झाली असल्याचे दिसून आले नाही हे विशेष !

उद्घानाअभावी प्रलंबित कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याची इमारत दिसत आहे.

     कोपरगाव शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी आ.आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणून त्या पूर्णत्वास नेल्या आहेत.त्या आधी माजी आ.अशोक काळे यांनी तहसील आणि पंचायत समितीच्या इमारती पूर्णत्वास नेल्या आहेत.तर माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव बस स्थानकाची इमारत (धुळवडीसह) कशी का असेना पूर्ण केली आहे.वर्तमान आ.काळे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीसाठी निधी आणून त्याचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात केले आहे.तर कोपरगाव न्यायालयाचे इमारतीसाठी मोठा निधी आणून ती इमारत प्रगतीपथावर आहे.मात्र कोपरगाव नगरपरिषद आणि पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या उद्घाटनास काही मुहूर्त लाभेना असे दिसत आहे.तालुका पोलिस ठाण्यास 02 फेब्रुवारी रोजी मुहूर्त मुक्रर झाला होता.मात्र त्या आधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्याने तो मुहूर्त हुकला आहे.आता उपमुख्यमंत्री पद त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मिळाले आहे.आता राष्ट्रवादीत ‘नवी विटी नवे राज्य’ निर्माण झाल्याने पुन्हा एकदा आ.आशुतोष काळे यांना प्रयत्न करावे लागणार आहे हे उघड आहे.त्याआधीच बहुधा तयारी म्हणून त्यांनी स्व.अजित पवार यांना पद्मभूषण देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे केली आहे असो ! पण आता तरी यांनी पोलिस ठाण्याची इमारतीचे उद्घाटन करणे गरजेचे आहे.शिवाय नगरपरिषदेने आता नवीन इमारतीला वेग देणे गरजेचे आहे.

कोपरगाव पोलिस वसाहत उद्घाटना अभावी दिसत असलेली इमारत.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने माहिती घेतली असता कोपरगाव नगरपरिषद नवी इमारत नगरविकास विभागाची वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत घेतली असून त्यासाठी तळमजला पहिला मजला आदी दोन मजल्यासाठी ०२ कोटी ४६ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर केले असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.हे काम शतप्रतिशत पूर्ण झाले असले तरी अद्याप संबंधित ठेकेदार के.के.थोरात यांचे साधारण ०३ लाख ४४ हजार रुपयांचे अंतिम बिल देणे बाकी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

  तर याशिवाय पहिला निधी खर्च होऊन पहिला मजला व दुसरा मजल्याचे कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेसह ०२ कोटी रुपये प्राप्त झाला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक तरतूद योजनेअंतर्गत ०२ कोटी निधी मंजूर होता असा एकूण ०४ कोटी निधी मंजूर होता.त्या अंतर्गत ०४ कोटी १९ लाख अंदाजपत्रक यातील ०३ कोटी निधी खर्ची पडला असल्याची माहिती मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिली आहे.

पूर्ण झालेली व उद्घाटन झालेली कोपरगाव शहर पोलिस ठाण्याची इमारत.

   दरम्यान वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ठोक तरतूद योजनेअंतर्गत ०२ कोटी रुपयांपैकी ०१ कोटी रुपये शासनाकडून येणे बाकी आहे.तर फर्निचरचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.२० टक्के बाकी आहे.दरम्यान अजून अग्नी सुरक्षेचे काम पूर्ण बाकी आहे.मात्र त्यासाठी निधी नाही.त्यामुळे त्यासाठी नगरोत्थाण जिल्हा स्तर योजनांतर्गत ५० लाख निधीची जिल्हा नियोजन समितीकडे मागणी करण्यात आली आहे.अद्याप इमारत परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे व नगर परिषद प्रांगण सुशोभीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”आपण आगामी काळात निधी मिळवून अग्नी सुरक्षेसह काम लवकर पूर्ण करून इमारतीचे उद्घाटन करणार आहे.तथापि यासाठी जवळपास एक वर्षाचा कालखंड लागू शकत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close