जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवडणूक

प्रसाद लाडांचेच भाजपात लाड कसे ? वहाडणे यांचा सवाल

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची नांवे जाहीर केली आहे.महाराष्ट्र भाजपाच्या ठराविक कंपूने स्वतःच्या मागेपुढे करणारे काही उमेदवार निवडलेले दिसतात असा आरोप करून प्रसाद लाड यांचे असे काय कर्तृत्व आहे कि त्यांना वरिष्ठ सभागृहाची उमेदवारी दिली आहे असा तिरका सवाल कोपरगाव येथील भाजप नेते विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये विचारला आहे.

“प्रसाद लाड यांचे इतके लाड करण्याचे कारण काय ? आर्थिक निकष लावून उमेदवारी देणे योग्य नाही.जेष्ठ नेते माधव भंडारी यांच्यासारख्या अनेक पात्र व्यक्ती असतांना त्यांचा विचार का होत नाही.त्याचप्रमाणे ओ.बी.सी.समाजात मोठी मान्यता असलेल्या असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाचे सहयोगी शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांचेही मराठा समाजात चांगलेच वजन असताना डावलले गेले आहे.याआधीही एकनाथ खडसे,जयसिंगराव गायकवाड,विनोद तावडे आदींना डावललेले आपण बघितलेच आहे.स्वतःचे एकहाती प्रभुत्व रहावे यासाठीच काहीजण असे उद्योग करत आहे”-विजय वहाडणे,भाजप नेते,कोपरगाव.

करोना परिस्थिती निवळल्यानंतर सहकारक्षेत्रासह अन्य ठिकाणच्या निवडणुका जाहीर होत आहेत.राज्यसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.त्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,भाजपचे राज्य सरचिटणीस श्रीकांत भारतीय,माजी मंत्री राम शिंदे,महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा खरे,आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यात प्रसाद लाड यांच्या नावावर कोपरगाव येथील भाजप नेते विजय वहाडणे यांनी आक्षेप नोंदवला आहे.त्यांनी या बाबत प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे की,प्रसाद लाड यांचे इतके लाड करण्याचे कारण काय ? आर्थिक निकष लावून उमेदवारी देणे योग्य नाही.जेष्ठ नेते माधव भंडारी यांच्यासारख्या अनेक पात्र व्यक्ती असतांना त्यांचा विचार का होत नाही.भाजपाचे प्रवक्ते म्हणून प्रभावी काम करणारे माधव भंडारी यांना खरेतर यापूर्वीच संधी मिळायला हवी होती.
त्याचप्रमाणे ओ.बी.सी.समाजात मोठी मान्यता असलेल्या व उत्कृष्ट वक्त्या असलेल्या पंकजा मुंडे यांनाही संधी मिळायला पाहिजे होती.भाजपाचे सहयोगी शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांचेही मराठा समाजात चांगलेच वजन आहे.त्यांनाही डावलले.याआधीही एकनाथ खडसे,जयसिंगराव गायकवाड,विनोद तावडे आदींना डावललेले आपण बघितलेच आहे.स्वतःचे एकहाती प्रभुत्व रहावे यासाठीच काहीजण असे उद्योग करत असल्याचे वारंवार निदर्शनास आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात स्पर्धकच नको म्हणून राष्ट्रीय पातळीवर पक्षसंघटनेत पाठवून द्यायचे.श्रीकांत भारतीय यांचे कर्तृत्व काय ? हेही जाहीर केले तर फार बरे होईल.यापूर्वी राज्यात सत्ता असतांना मंत्रालयात बसून श्रीकांत भारतीय कुणाची काय सेवा करत होते हे सामान्य कार्यकर्त्यांना माहीत झाले तर सर्वांचेच समज गैरसमज दूर व्हायला मदतच होईल.त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांचे कोणते विभाग श्रीकांत भारतीय सांभाळीत होते ? आपण नगरपरिषदेचा अध्यक्ष असताना कोपरगाव नगरपरिषदेच्या विकासकामांचे प्रस्ताव घेऊन त्यांचेकडे वारंवार गेलो-फाईलही दिल्या,पण श्रीकांत भारतीय यांनी कुणाच्या आदेशावरून टाळाटाळ केली ? आपण जर वहाडणे नसतो व आपण काही (?) कबूल केले असते तर कदाचित काम झालेही असते असे मला आज वाटते.आदर्श-निष्कलंक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळे पक्षाचे कार्यकर्ते काही बोलत नाहीत.पक्षशिस्तीच्या नावाखाली कुणीही काहीच बोलायचे नाही.याचाच गैरफायदा घेऊन महाराष्ट्र भाजपात मनमानी सुरू आहे.कार्यकर्ते शिस्तबद्ध व संयमी आहेत.पण महाराष्ट्रातील काही भाजपा नेते मात्र मनमानी व कंपूबाजीत व्यग्र असल्याही टीकाही कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close