गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात कुत्र्यांना मारणारी टोळी निष्पन्न ?

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन त्याना मारणारी टोळी निष्पन्न झाली असून त्या बाबत वारी येथील फिर्यादी यांनी प्रसाद हरिभाऊ जाधव (वय-३५) रा.वारी यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी उमाकांत प्रभाकर टेके व श्रीकांत प्रभाकर टेके दोघे रा.वारी यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या आरोपीनी हे कुत्रे नेमके का मारले ? याचे कारण अद्याप निष्पन्न व्हायचे आहे.पोलीस चौकशीत हि बाब उघड झाल्यावर खरे कारण स्पष्ट होणार असल्याने या तपासाकडे तालुक्यातील पाळीव प्राणी प्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वर्तमानात कोरोना साथ आटोक्यात येताना दिसत असताना आता कुक्कुट पालकांना सन-२००६ साली जेरीस आणणारा “बर्ड फ्ल्यू” या आजाराने डोके वर काढले आहे.त्यामुळे बोकडाच्या मटणाचे दर गगनाला भिडले आहे.तर कोंबड्यांचे मटणाचे दर खाली आहे.याचा फायदा अवैध मांस विक्री करणाऱ्यांची चंगळ होताना दिसत असून काही वर्षांपूर्वी देहरे घाटात एका सार्वत्रिक निवडणुकीनंतर कुत्र्यांची निव्वळ मुंडकी आढळून आली होती.या घटनेतून कुत्र्यांची तस्करी करून त्या मांस हॉटेलचालकांना विकणारी टोळी निष्पन्न झाली होती.त्या आरोपींवर गुन्हेही दाखल झाले होते.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुक्यात प्रथमच कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांना मूर्च्छित करणारी टोळी आढळल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.या बाबत वारी ग्रामपंचायत हद्दीतील फिर्यादी प्रसाद जाधव यांनी नुकताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की,”आरोपी उमाकांत टेके व श्रीकांत टेके यांनी काहीतरी विषारी औषध घालून ते पदार्थ कुत्र्यांना खाऊ घालून त्यांना गुंगी येण्याचे प्रयत्न केले आहे.त्यातून जवळपास एक ते दीड वर्षाचे सात कुत्रे मयत झाले आहे.तसेच काही कुत्र्यांना गुंगी आलेली आढळून आली आहे.वैगरे बाबी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.५१/२०२१ भा.द.वि कलम ४२८,सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणे बाबत अधिनियम १९६० चे ११(१) प्रमाणे आरोपी उमाकांत टेके व श्रीकांत टेके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.