तंत्रज्ञान
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग सर्वात कठीण – युरोपियन स्पेस एजन्सी
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खूप कठीण वातावरण आहे. इथे निकाल खूप अनपेक्षित, धोकादायक आणि आश्चर्यकारक असू शकतो.
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेप्रमाणे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने सुद्धा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवरहित मोहिमेची आखणी केली होती. २०१८ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवण्याची त्यांची योजना होती. पण पुरेशा निधी अभावी त्यांना आपली नियोजित मोहिम रद्द करावी लागली. या मोहिमेची आखणी करताना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यामध्ये काय धोके आहेत त्यासंबंधी अहवाल तयार करण्यात आला होता.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खूप कठीण वातावरण आहे. इथे निकाल खूप अनपेक्षित, धोकादायक आणि आश्चर्यकारक असू शकतो असे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेच्या अहवालात म्हटले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील धूळ उपकरणांना चिकटू शकते. त्यामुळे यांत्रिक बिघाड उदभवू शकतो. सोलार पॅनलवर सुद्धा त्याचा परिणाम होईल. त्यामुळे त्या उपकरणांची क्षमता कमी होईल असे या अहवालात म्हटले होते.
चंद्रावर शेवटचे पाऊल ठेवणाऱ्या यूजीन सेर्नान यांनी चंद्रावरील धुळीसंदर्भात भाष्य केले होते. ईएसएच्या अहवालात त्यांच्या वक्तव्याचा दाखला आहे. युरोपियन अवकाश संशोधन संस्था आता कॅनडा आणि जपानच्या अवकाश संशोधन संस्थेसोबत मिळून हेरॅकल्स रोबोटिक मिशनवर काम करत आहे. २०२० मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगची ही मोहिम आहे. नासाची २०२४ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी मोहिमेची योजना आहे. या मोहिमेची आखणी करताना नासा चांद्रयान-२ मोहिमेचा अभ्यास करेल. दक्षिण ध्रुवावर लँडिंगमध्ये १७ प्रकारचे धोके आहेत.
सॉफ्ट लँडिंग यशस्वी ठरले असते तर अमेरिका, रशिया, चीननंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरला असता. भारताव्यतिरिक्त कुठल्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे लँडिंग यशस्वी ठरले असते तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश ठरला असता.