तंत्रज्ञान
चांद्रयान-२’नं पृथ्वीची कक्षा सोडली; आता चंद्राच्या दिशेनं प्रवास सुरू
नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) सोडलेल्या ‘चांद्रयान-२‘नं प्रवासाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री २ वाजून २१ मिनिटांनी यानानं पृथ्वीला ‘बाय-बाय’ केले. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून ‘चांद्रयान-२’नं आता थेट चंद्राच्या दिशेनं सरळ प्रवास सुरू केला आहे.
पृथ्वीची कक्षा सोडण्यापूर्वी ‘इस्रो’नं ‘ट्रान्स लूनार इंजेक्शन’ (टी.एल.आय.) हा किचकट प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला आहे. ‘चांद्रयान-२’चा चंद्राच्या बाह्य कक्षेत सहज प्रवेश व्हावा म्हणून यानातील लिक्विड इंजिन सुमारे १,२०३ सेकंदापर्यंत प्रज्वलित केले गेले. या क्रियेनंतर तब्बल २२ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिलेल्या चांद्रयानानं चंद्राच्या हद्दीत प्रवेश केला आहे.
‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी ‘चांद्रयान-२’ पुढील प्रवासाबद्दल माहिती दिली. ‘चांद्रयान-२’ हे चंद्राच्या वाटेवर सहा दिवस असेल आणि सुमारे ४.१ लाख किलोमीटरचा प्रवास करून २० ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल,’ असं सिवान म्हणाले. चंद्र हा पृथ्वीपासून ३.८४ लाख किलोमीटर अंतरावर आहे. सात सप्टेंबरला हे यान चंद्राच्या भूमीवर उतरणे अपेक्षित आहे.या मोहिमेकडे भारताच्या नागरिकांसह जगभराचे लक्ष लागून आहे.