गुन्हे विषयक
मुलगी अचानक बेपत्ता,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहराच्या पश्चिमेस साधारण पाच-सात कि.मी.अंतरावर रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी (वय-१६) हिला अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची फिर्याद सदर मुलीच्या आईने (वय-३५) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये कोपरगाव तालुक्यात वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते त्यानंतर होणारा मनस्ताप निराळाच असतो.या घटनात दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.त्यामुळे पोलिसांसह पालकांची चिंता वाढली आहे.
वारंवार घडणाऱ्या या घटनात सदर मुलगी सापडल्यावर मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिस देखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागे देखील घेतले जातात.मात्र यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
त्या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीची आई हि शहर पोलीस ठाण्याच्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून त्यांचा शेत मजुरीचा व्यवसाय आहे.तेथे ते आपल्या पत्नी,आई,वडील,व आपल्या सोळा वर्षीय मुलीसह आपल्या छोट्या घरात राहतात.बुधवार दि.१९ ऑक्टोबर सकाळी ०९ वाजेच्या सुमारास सदर मुलगी हि गावात गेली असता तीस कोणातरी अज्ञात आरोपीने काही तरी प्रलोभन दाखवून अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेली आहे.त्यामुळे त्यांनी आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे शोध घेऊन कंटाळून त्यांनी अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पो.हे.कॉ.के.ए.जाधव यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३२७/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.जाधव हे करीत आहेत.