गुन्हे विषयक
कोपरगावात वाळू चोरांविरुध्द मोठी कारवाई,एक डंपर,ट्रॅक्टर जप्त !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू चोरांचा सुळसुळाट झालेला असताना व त्यातून अनेक गुन्हेगारी उघड होत असताना कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी नुकतीच एक अवैध वाळू उपसा संबंधी कारवाई झाली असून त्यात स्वरूप कापे व बाबासाहेब कापे यांचा एक भारत बेंझ डंपर व अन्य एक ट्रॅक्टर जप्त केला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना जवळपास ४-५ लाख रुपयांचा दंड होऊ शकतो अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.त्यामुळे वळूचोरांत खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांनी या महसुली पथकाच्या कारवाईला साथ दिली तर तालुक्यात वेगळे चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही मात्र तालुक्याचे दुर्दैवी असे की या दोन्ही यंत्रणा एक जीवाने कारवाई करत नाही यामुळे वाळूचोर चेकाळले आहे.त्यातून तालुक्यात मोठी गुन्हेगारी वाढली असून गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट झाला आहे.त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीतून मोठ्या प्रमावणार अवैध वाळू उपसा होत असून या बाबत कारवाई होणे अपेक्षित असताना याबाबत महसूल विभाग व पोलिस विभाग कानाडोळा करतो असा नेहमी आरोप होतो.मात्र याबाबत परवा शनिवार दिनांक २९ मार्च २०२५ हा दिवस अपवाद ठरला असून त्यात महसूल विभागाने तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांच्या पथकाने मायगाव देवी ते धामोरी रस्त्यावर वाळू चोरांविरुध्द दुपारी ३.३० दरम्यान मोठी कारवाई केली असल्याची माहिती हाती आली आहे.गत महिन्यात १८ मार्च रोजी महसुली विभागातील धारणगाव येथील तलाठी धनजंय पऱ्हाड,मंडलाधिकारी पोकळे व त्याचा सहकारी सागर उर्फ बबलू चौधरी यांना २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले असताना व त्या नंतर कोळपेवाडी येथे फिर्यादी परवाना धारक वाळू वाहतूक चालकाकडून ०५ हजार रुपयांचा मासिक हप्ता वसूल करताना व चाकू तोंडावर छातीवर वार करून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी तोतया वार्ताहर यांचे विरुध्द कारवाई केल्याचे घटना ताजी असताना ही कारवाई लक्षवेधी समजली जात आहे.
याबाबत समजेलेली माहिती अशी की,” यातील स्वरूप कापे याने वाळू उपसा करण्याचा ठेका घेतला आहे तर शनिवार दिनाक २९ मार्च रोजी दुपारी ३.३०-४ वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील अवैध वाळू उपसा प्रतिबंधक पथकास मायगाव देवी या ठिकाणी गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती.त्यानुसार वरील पथकाने मायगाव देवी या ठिकाणी धाव घेऊन त्या ठिकाणी एक भारत बेंझ हा पिवळ्या-निळ्या रंगाचा डंपर व एक ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करताना आढळून आला आहे.यातील डंपर चालक बाबासाहेब कापे यांचा हा डंपर पथकाने पकडला कारण त्याकडे असलेली अधिकृत पावतीची वेळ ही दुपारी १.३० ची असताना वाळू मात्र दुपारी ३.३० वांजेच्या सुमारास घेऊन जात होता.त्यांचे संशयास्पद वाहन संबधित पथकाने अडवले होते व त्याची चौकशी केली असता हा गैरप्रकार उघड झाला आहे.
या प्रकरणी नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते यांनी सदर वाहने अडवून त्यांना ताब्यात घेतल्यावर हा प्रकार उघड झाला आहे.त्या वाहनांना ताब्यात घेऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.त्यात त्यांना लेखी समर्पक उत्तरे देता आली नाही तर त्यांचे विरुध्द महसुली कारवाई होऊन सुमारे चार ते पाच लाख रूपयांची दंडात्मक कारवाई होऊ शकते अशी माहिती नायब तहसीलदार सातपुते यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्यांच्या पथकाच्या या कारवाईचे कौतुक होतं आहे.त्याला कोपरगाव येथील तहसीलदार महेश सावंत यांनी दुजोरा दिला आहे.कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांनी या महसुली पथकाच्या कारवाईला साथ दिली तर तालुक्यात वेगळे चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असे नागरिकांत बोलले जात आहे.मात्र तालुक्याचे दुर्दैवी असे की या दोन्ही यंत्रणा एक जीवाने कारवाई करत नाही यामुळे वाळू चोर चेकाळले असल्याचे बोलले जात आहे.त्यातून तालुक्यात मोठी गुन्हेगारी वाढली असून गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट झाला आहे त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.