कोपरगाव तालुका
..या पाणीपुरवठा योजनेसाठी शेती महामंडळाच्या जागेची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील मोठी लोकसंख्या असलेल्या वाकडी गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारा साठवण तलावाला पाणी पुरविण्यात मर्यादा आल्याने नवीन साठवण तलावासाठी शेती महामंडळाची ४ हेक्टर ८८ आर जमीन वाकडी ग्रामपंचायतीला विनामुल्य उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी महसूल मंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
वाकडी गावाचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांची नुकतीच त्यांच्या दालनात भेट घेऊन शेती महामंडळाची जमीन मिळावी यासाठी निवेदन दिले. त्यांनी निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, वाकडी गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी साठवण बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी वाकडी गावची लोकसंख्या ७ हजार ५०० एवढी होती. आजमितीला वाकडी गावची लोकसंख्या १५ हजारावर जावून पोहचली आहे. त्यामुळे नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी नवीन साठवण तलावाची निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे. शेती महामंडळाची गट क्र.२१६/२ मध्ये ४ हेक्टर ८० आर. क्षेत्र नाल्यामध्ये आहे. या क्षेत्रामधून गोदावरी उजवा तट कालवा जात असून या कालव्यावर पाणी वितरणासाठी गेट (एस.के.एफ.) आहे.
हे क्षेत्र ग्रामपंचायतीला मिळावे यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे तसेच अहमदनगर मुद्रांक जिल्हाधिकारी व जिल्हा निबंधक प्रशासकीय अधिकारी यांचे कार्यालयाकडून या क्षेत्राचे बाजारमूल्य वाकडी ग्रामपंचायतीस प्राप्त झाले आहे. मात्र या बाजारमुल्याची रक्कम मोठी आहे. वाकडी ग्रामपंचायतीकडे एवढा मोठा निधी उपलब्ध होणे अवघड आहे. त्यामुळे या क्षेत्रावर राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत संपूर्ण क्षेत्रात साठवण तलाव तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी हे क्षेत्र वाकडी ग्रामपंचायतीस कोणत्याही प्रकारचे मुल्य न आकारता विनामूल्य द्यावे. वाकडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याची निर्माण झालेल्या टंचाईची महसूल मंत्र्यांनी प्रश्नाची गंभीरपणे दखल घेत याबाबत तातडीने निर्णय घेऊन वाकडीच्या ग्रामस्थांची अडचण सोडवू असे आश्वासन महसूलमंत्री यांनी दिले आहे.