कोपरगाव तालुका
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजारांची मदत
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील शेतकरी विश्वनाथ भागुजी भुसे यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५० हजार रुपये मदतीचे मंजुरी पत्र माजी आ.अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते रुग्णांचे नातेवाईक उत्तम भुसे यांना नुकतेच दिले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, विश्वनाथ भुसे मागील काही वर्षापासून हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे होते. भुसे यांना या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येणार होता मात्र एवढा मोठा खर्च करण्याची त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी आ. काळे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी विनंती केली होती. त्याची या संबंधित विभागाने तातडीने दखल घेत पाठपुरावा करून भुसे यांना ५० हजार रुपयांची मदत मिळवून दिली आहे.
यावेळी बोलतांना आ.काळे म्हणाले की, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी मागील काही वर्षापासून विविध मोफत आरोग्य शिबिरे राबविली आहेत. यामध्ये नेत्र तपासणी,हृदयरोग, गुडघेदुखी, सांधेरोपण अशी अनेक शिबिरे घेतली असून त्या शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे.मात्र काही नागरिकांना अचानकपणे अशा मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यावेळी अशा आजारांच्या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च कसा उपलब्ध करायचा असा प्रश्न रुग्ण व रुग्णाच्या कुटुंबाला पडतो. त्यामुळे रुग्णासह सर्वच कुटुंब काळजीत असते. अशा कुटुंबासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आशेचा किरण आहे. ज्या रुग्णांची मोठ्या आजारांसाठी खर्च करण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाही अशा रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी आपण सदैव तयार असल्याचे सांगितले. यावेळी तातडीने मदत मिळवून दिल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी आ. काळे यांचे आभार मानले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल कदम उपस्थित होते.