कोपरगाव तालुका
आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या-आ.काळेंची मागणी
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी केलेल्या विविध आंदोलन प्रसंगी अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून गृहखात्याने हे गुन्हे तातडीने मागे घ्यावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांचेकडे नुकतीच केली आहे.
काही वर्षापासून राज्यात सातत्याने दुष्काळ पडत आहे.त्यामुळे शेतकरी अनेकवेळा अडचणीत येत आहे.त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात शेतकरी आंदोलने केली आहे. एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे शेतमालाला मिळत नसलेला अपेक्षित दर यामुळे शेतकरी पिचला असतांना तत्कालीन शासनाचेही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले होते. शेतकऱ्यांना कुणीही वाली राहिला नाहीं अशी परिस्थिती मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांची झाली होती. त्यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलने केली. शेतकऱ्यांनी केलेली आंदोलने ही पूर्णत: शांततेच्या मार्गाने झाली आहेत. तत्कालीन शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन देखील करावे लागले आहे. मात्र या रास्ता रोको आंदोलनात काही समाजकंटकांनी सहभागी होवून या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याला आपला प्राण देखील गमवावा लागला आहे.
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांचा मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असतांना आंदोलनावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा ससेमिरा शेतकऱ्यांच्या मागे लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मागील सरकारने अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील महाविकास आघाडी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अस्मानी किंवा सुलतानी संकटाला शेतकरी आज पर्यंत मोठ्या हिमतीने सामोरा जावून ताठ मानेने उभा आहे मात्र न केलेल्या गुन्ह्याच्या पोलिसांच्या चौकशीला शेतकऱ्यांना हजर राहावे लागत आहे. या परिस्थितीचा आपण विचार करून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत वेळोवेळी शेतकरी आंदोलनावेळी
ज्या शेतक-यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनात शेवटी केली आहे.