कोपरगाव तालुका
विद्यार्थ्यांना ध्यानाच्या माध्यमातून मिळतो आत्मविश्वास – नंदकुमार सुर्यवंशी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आदिवासी विकास विभागाच्या विद्यार्थ्याशी आमचे खूप वर्षापासून स्नेहाचे नाते आहे. आम्ही आत्मा मालिक माउलींच्या शिकवणीनुसार त्यांना आदिवासी विभागाचे विद्यार्थी न म्हणता ‘आत्मरूप विभागाचे’ विद्यार्थी आहे असे म्हणतो कारण ते एक ईश्वराचेरूप आहेत. या विद्यार्थ्याचा साधेपणा, सहजपणा, प्रामाणिकपणा, प्रचंड कष्ट करण्याची धडपड, जिद्द सहज मनाला भावते. मात्र गरज आहे ती आत्मविश्वासाची की आम्ही प्रत्येक गोष्ट करू शकतो ? या तीन दिवसीय शिबिराच्या निमित्ताने तुम्हाला ध्यानाच्या माध्यमातून आत्मविश्वास मिळणार असल्याचे प्रतिपादन जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
आदिवासी विभागाअंतर्गत चालविल्या जाणा-या सीबीएसई बोर्ड अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने चालविल्या जाणा-या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलमधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याचे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आत्मा मालिकमध्ये आयोजन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त, किरण कुलकर्णी व उपआयुक्त अविनाश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.या शिबिराचे उद्घाटन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून झाले त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर एकलव्य निवासी वसतिगृहाचे प्रमुख के.टी.नाथन, प्रमोद कुलकर्णी, ट्रस्टचे व्यवस्थापक हिरामण कोल्हे, प्राचार्य कांतीलाल पटेल, सुधाकर मलिक, योगेश गायके, विषय तज्ज्ञ मार्गदर्शन अजय कुलकर्णी, चारूदत्त गोखले, संजीवनी दामले, कर्मानी थावराजी, शशिकांत नंदगिरवार, बियानी आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना नाथन म्हटले की, या शिबिरात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल नाशिक, अमरावती, पालघर, नागपूर, नंदुरबार, नाशिक, गडचिरोली, गोंदिया या विभागातून तीनशे विद्यार्थी व विद्यार्थींनीनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला आहे.
सदर अभ्यास शिबिर दिनांक २२ डिसेंबर ते २४ डिसेंबर असे तीन दिवसीय निवासी असणार आहे. यात प्रथम दोन दिवसामध्ये विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक करिअर विषयक मार्गदर्शन करणार आहे. तर शेवटच्या दिवशी सदर विद्यार्थ्यासाठी प्रवरा मेडिकल कॉलेज, प्रवरानगर व संजीवनी अभियांत्रिकी कॉलेज, कोपरगांव येथे अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदिनी वक्ते यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रमोद कुलकर्णी यांनी मानले.