कोपरगाव तालुका
कोपरगाव शहरातील पायाभूत सुविधांसाठी निधी द्या-आ.आशुतोष काळें
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील रस्ते,गटारी खराब झाल्या असून सर्वच रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. या खराब रस्त्यांचा शहरातील नागरिकांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कोपरगाव शहरातील नागरिक सातत्याने विविध आजारांचा सामना करीत असून नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी वाढीव निधी द्यावा अशी मागणी कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे नगरविकास व पाणी पुरवठा मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी गटारांचे पाणी उघड्या वरून वाहत आहे. शहरातील हे सांडपाणी गोदावरी नदीपात्रात जाऊन साचते. तसेच शहरातील उघड्या गटारी ठीकठिकाणी तुंबत असल्यामुळे त्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. कोपरगाव शहरातील नागरिक डेंग्यू, मलेरिया अशा जीवघेण्या आजाराचा अनेक दिवसांपासून सामना करीत आहे. शहरातील उघड्या गटारीचे पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्त्यांची हानी होऊन रस्ते खराब झाले आहे. त्यासाठी भूमिगत गटारी होणे अत्यंत आवशक असून त्यासाठी केंद्र सरकारच्या भुयारी गटार योजने अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेस १२५ कोटी रुपयांचा निधी मिळावा.-आ. काळे
त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील सर्वच रस्ते अतिशय खराब झाले असून दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पाच वर्षात रस्ते दुरस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्वच रस्त्यांची वाताहत झाली आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असून वाहन धारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यासाठी कोपरगाव शहरातील रस्ते दुरुस्ती साठी भरीव निधी द्यावा. कोपरगाव शहर हे गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले आहे. कोपरगाव शहराला धार्मिक, ऐतिहासिक व पौराणिक वारसा आहे. शहरात शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, रेल्वे स्टेशन व मोठी बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. कोपरगाव नगर परिषदेस “ब” वर्ग दर्जा असून शहराची लोकसंख्या अंदाजे ७५ हजार आहे. कोपरगाव नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे नागरिकांना सोयीसुविधा मिळत नाही.
कोपरगाव नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत (टप्पा २) बाधण्यासाठी, माधव उद्यान विकसित करणे, आठवडे बाजार विकसित करणे, मध्यवर्ती अमरधाम व कोपरगाव बेटातील अमरधाम विकसित करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेस २० कोटी रुपये निधी द्यावा. तसेच कोपरगाव शहराभोवती नवनवीन वसाहती विकसित होत असून अंदाजे १० हजार नागरिकांना रस्त्यांच्या सोयी सुविधा देण्यासाठी नगरपरिषद वाढीव हद्द योजने अंतर्गत रस्त्यांसाठी १० कोटी रुपये मिळावे. कोपरगाव शहरातील सर्व रस्ते खराब झाल्यामुळे या रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये मिळावे. धारणगाव व इतर ४ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत मुर्शतपूर,जेऊर पाटोदा, हिगणी, चांदगव्हाण व धारणगाव या पाच गावांची पाणी योजना अवलंबून आहे. सन २०१९/२० व सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन दरसूचीनुसार या योजनेची किंमत रुपये ६७७.४९ लक्ष ढोबळ झाली असून या पुनर्सुधारित धारणगाव व इतर ४ गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी तातडीने सुधारित निधी मिळावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी नगरविकास व पाणी पुरवठा मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.