कोपरगाव तालुका
शनिवारी कोपरगावात कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या माधवराव आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विविधांगी कौशल्य विकास कार्यशाळा व भारत रत्न जे.आर.डी. टाटा आटोमोबाईल कार्यशाळेचे उदघाटन कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते येत्या शनिवार दि.१४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक कैलास ठोळे हे राहणार आहे.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत श्रम बाजारात पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्यांवर मुख्यत्वे करून लक्ष केंद्रीत केले जाणार आहे आणि विशेषत: 10 वी व 12 वी नंतर शिक्षण अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांवर देखील लक्ष केंद्रीत केले जाईल. एनएसडीसीच्या प्रशिक्षण भागीदारांद्वारे या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. सध्या अंदाजे 2,300 केंद्रांवर एनएसडीसीचे 187 प्रशिक्षण भागीदार आहेत. या व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारांशी संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना देखील या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी जोडण्यात येणार आहे.
कोणत्याही देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कौशल्य व ज्ञान या दोन प्रेरणादायी बाबी आहेत. सध्याच्या वैश्विक परिस्थितीमध्ये ज्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थांकडे उच्च कौशल्य पातळी आहे ते देश कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतात.कोणत्याही देशामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमासाठी मुख्यत: युवा पिढीवर लक्ष केंद्रीत केले जाते. या संदर्भात आपल्या देशाची स्थिती चांगली आहे. लोकसंख्येमधील एक मोठा गट कृतीशील आहे. यामुळे भारताला सुवर्ण संधी प्राप्त होते परंतु त्याचसोबत समोर मोठी आव्हाने देखील उभी ठाकतात. जेव्हा आपली लोकसंख्या विशेषत: युवा पिढी निरोगी, सुशिक्षित व कुशल होईल तेव्हाच आपल्या अर्थव्यवस्थेला याचा लाभ होईल. या अपेक्षेने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि योजना सुरु केली आहे.कोपरगावात नगरपरिषदेने आपल्या शहरातील विद्यार्थ्यांसाठी हि योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचे उदघाटन शनिवारी सकाळी नऊ वाजता होत आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भाजपचे शहाराध्यक्ष विनायक गायकवाड,जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष छोटुभाई जोबनपुत्रा,बाळासाहेब मांढरे,सादीकभाई शेख, जिल्हा प्रकल्प समन्वयक सुशील पठारे यांची लाभणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.