कोपरगाव तालुका
..या महाविद्यालयात “भूगोल दिन” उत्साहात साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालय येथे भूगोल विभाग व संशोधन केंद्रातर्फे नुकताच भूगोल दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला आहे.
देशाच्या पातळीवरील भूगोल विषय-तज्ज्ञ प्रोफेसर चं.धुं.ऊर्फ सी.डी.देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पंडीत भीमसेन जोशी यांच्या हस्ते झाला होता.पुण्यातील पत्रकार, लेखक डॉ. सुरेश गरसोळे यांनी तो घडवून आणला होता.तेव्हापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी डॉ. देशपांडे यांचा जन्मदिन महाराष्ट्रभर ‘भूगोल दिन’ म्हणून विशेषतः शालेय पातळीवर सुरू आहे.
मकर संक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो.ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे.म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले.त्यानुसार भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जातात.व्याख्याने,ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकांचे महत्त्व सांगणे,भौगोलिक सहली,नकाशे व इतर भौगोलिक साहित्याची प्रदर्शने,भौगोलिक विषयावर निबंध लिहिणे, इतर विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जातात.वर्षांतून एकदा तरी या विषयावर लक्ष केंद्रित व्हावे या उद्देशाने अनेक उपक्रम घेतले जातात.कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या महाविद्यालयांत हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
या दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेतले जातात.मात्र या वर्षीच्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे भूगोल दिनाचा कार्यक्रम हा ऑनलाइन पद्धतीने साजरा केला गेला आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर येथील एस.बी.पी.कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ.दीपक देडे यांचे विशेष मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमास विभागातील ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
डॉ.दीपक देडे यांनी याप्रसंगी भूगोल,भूतकाळ,वर्तमानकाळ व भविष्यकाळ या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी भूगोलातील महान व्यक्ती अलेक्झांडर हम्बोल्ट,कार्ल हिटर यांच्या विचारांनापासून सुरुवात करून अलीकडच्या काळातील भौगोलिक माहिती प्रणाली,उपग्रह प्रतिमा व भूगोल या विषयांमध्ये ज्या उपग्रह प्रतिमा व भूगोल या विषयांमध्ये ज्या ज्या घडामोडी झाल्या त्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली .
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी महाविद्यालयाची मागील काही वर्षापासून केलेल्या कामगिरीची माहिती व भविष्यामध्ये के.जे.सोमैया महाविद्यालय कसे असेल याचीही माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
भूगोल विभाग व संशोधन केंद्र प्रमुख डॉ.जी.के.चव्हाण यांनी प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.दीपक देडे यांची ओळख करून दिली.तसेच महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विविध विद्यार्थीप्रिय व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. विभागातील नव्याने सुरु करण्यात संशोधन केंद्रामध्ये पाच संशोधन प्राध्यापक कार्यरत असून पहिल्या फेरीमध्ये सात विद्यार्थी विविध भौगोलिक समस्यांवर संशोधन करत आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भूगोल विभागातील प्रा.डॉ.लीना त्रिभुवन यांनी केले तर प्रा.डॉ.साळुंके यांनी मान्यवरांचे आभार मानले. तसेच विभागातील प्रा.आकाश सोनवणे व प्रा.कुणाल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजनास सहकार्य केले आहे.