कोपरगाव तालुका
प्राथमिक शिक्षणाचा पाया गुणवत्ताभिमुख करा-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
शिक्षकांनी समर्पित भावनेने खळखळत्या पाण्यासारखे स्वतःला वाहून घेतले तरच चारित्र्यशील समाज निर्माण होऊ शकतो.त्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा पाया गुणवत्ताभिमुख व अधिक बळकट करण्यासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक रमाकांत काटमोरे यांनी नुकतेच संवत्सर येथे बोलताना केले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचावे ते गुणवत्तापूर्ण आणि जीवनाभिमुख असावे ही जाणीव शिक्षकांमध्ये वाढण्याची आवश्यकता आहे.एकविसाव्या शतकाचा कालमहिमा ज्ञानावर निर्भर राहणार असल्याने ज्ञानाच्या नव्या क्षितिजांना गवसणी घालण्याइतकी आपली शिक्षणव्यवस्था व्यापक आणि सर्वसमावेशक झाली पाहिजे-राजेश परजणे,जि. प.सदस्य
अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांची शिक्षण उपसंचालक म्हणून तर उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे यांची शिक्षणाधिकारी म्हणून नुकतीच पदोन्नती झाली तर कोपरगाव तालुक्यातील केंद्रप्रमुख दिलीप ढेपले हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असून या तिघांचा जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे व संवत्सर ग्रामस्थांच्यावतीने पदोन्नती व निवृत्ती असा संयुक्तिक सत्कार सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी काटमोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे हे होते.
याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ,गट शिक्षणाधिकारी पोपटराव काळे,विस्तार अधिकारी श्रीमती शबाना शेख,केंद्रप्रमुख दिलीप ढेपले,ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण साबळे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कामात वक्तशीरपणा आणि अचूक व्यवस्थापन असले की त्या कामातला उद्देश सफल होतो.जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारे उपक्रम शिक्षण विभागाने राबविले पाहिजेत.अहमदनगर जिल्हा परिषदेने हे ध्येय सुरुवातीपासूनच अंगीकारलेले आहे.त्यामुळेच राज्यात ही जिल्हा परिषद अग्रेसर आहे.आधुनिक काळातील ज्ञान हे प्रचंड स्पर्धात्मक ठरलेले असल्याने शिक्षण आणि समाज यांच्या एकमेकांवर होणाऱ्या परिणामांची दखल घेणे आज क्रमप्राप्त ठरते. विज्ञान हे सामाजिक धन आहे ते सगळ्यांनाच मिळाले पाहिजे हा विचार सर्वार्थाने वाढण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी अरुण धामणे यांनी आपल्या भाषणातून प्रशासनातील कामाचा अनुभव कथन केला सरळ प्रामाणिक आणि परखडपणे वागणे हे सचोटीचे आणि कसोटीचे काम असले तरी आपल्या कामाची जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली तर त्या कामाचे समाधान मिळते. स्वतःचा अनुभव कथन करताना श्री धामणे यांनी शिक्षणाची प्रभावी शक्ती सामाजिक परिवर्तनासाठी सर्व पातळीवर पोहोचली पाहिजे हा ध्यास शिक्षकांमध्ये रुजायला हवा. चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी नवविचारांचे संस्करण होणे आज गरजेचे असल्याचेही शेवटी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक बाळासाहेब साबळे यांनी केले तर संवत्सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांनी सूत्रसंचलन केले तर शिक्षक सुनील ढेपले यांनी आभार मानले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून आणि शासनाचे सर्व नियम पाळून पार पाडण्यात आला.या कार्यक्रमात प्रारंभी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक बाळासाहेब साबळे यांनी केले तर संवत्सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांनी सूत्रसंचलन केले तर शिक्षक सुनील ढेपले यांनी आभार मानले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सामाजिक अंतर ठेवून आणि शासनाचे सर्व नियम पाळून पार पाडण्यात आला.या कार्यक्रमात प्रारंभी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.