नगर जिल्हा
श्री सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालयामध्ये कर्मवीर गीतगंधाली संगीत कार्यक्रम संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या भगीरथ प्रयत्नातून शिक्षणाची ज्ञानगंगा गरीबांच्या झोपडीपर्यंत आल्याने व सदर संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीच्या औचित्याने रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत डॉ.संभाजी पाटील यांच्या वतीने प्रस्तुत डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील गीतगंधाली सुगम संगीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.
भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू करुन मोठे काम केले. त्यांच्या या कार्याची शतकोत्तर वाटचाल सुरु आहे.त्यांचे स्मरण ठेऊन कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात गीत गंधाली कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात लई होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे होते.
सदर कार्यक्रमास कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप दारूणकर, संदीप वर्पे,सुनिल गंगुले, उपप्राचार्य प्रा.आर.एस. झरेकर, डॉ.विजय निकम, प्रा. डी.डी.सोनवणे, अधीक्षक वसंत पवार तसेच सर्व प्राध्यापक शिक्षकेतर सेवक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी–विद्यार्थिनी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रा. संभाजी पाटील यांनी ‘रयतेमधून नव्या युगाचा माणूस येथे घडतो आहे’ या गीताने करून ‘कर्मवीर गाथा’, ‘वाऱ्यावरील वाटसरू मी’, ‘सांगा भाऊराव सांगा… कोण आहे अपराधी’, ‘उपेक्षितांच्या उद्धारास्तव जन्म जाहला संस्थेचा’, ‘जात्यावरील ओव्या’, ‘जोडा नाते मातीशी’, ‘आरे आभाळाएवढं हिला कोणी दिलं मन’, ‘करू द्या त्यांना ग्रँटबंदी मी तसा झुकणार नाही’, ‘गोपाला… गोपाला भक्तीगीत’, ‘धरणी दुभंगली वट उन्मळला’, ‘फडकत राहो ध्वज कीर्तीचा’, व ‘तूच चंद्रमा’, इ. गीतांच्या संगीत जलसातून कर्मवीरांच्या व्यक्तित्व व कर्तृत्वाची महती सांगितली. निवेदिका प्रा.प्रज्ञा संभाजी पाटील व प्रा.वर्षा गायकवाड यांनी कर्मवीरांचा जीवनपट उलगडवून दाखवला, तबलापटू मल्हारी गजभारे व त्यांचे सहकारी यांनी संगीताची साथ दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे यांनी कर्मवीरांच्या कार्याच्या योगदानाची ओळख करून देताना गीतगंधाली या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मौलिकता सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी करून दिला, सूत्रसंचलन प्रा.छाया शिंदे यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ.रामदास पवार यांनी मानले.