नगर ( प्रतिनिधी)- शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटासाठी दिल्लीत तळ ठोकुन राहुनही नगर दक्षिण मतदार संघातील तिकिट कापलेल्या खासदार दिलीप गांधींनी रविवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नगरला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात गांधी आपली पुढील रणनिती स्पष्ट करणार आहेत. खासदार दिलीप गांधीच्या या मेळाव्याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.रविवारी टिळक रोड वरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
सलग पंधरा वर्षे खासदार असलेल्या दिलीप गांधी यांना भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत यंदा डावलले. भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. आणि ऊमेदवारीही मिळविली.सुजय विखेंनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत प्रवेश मिळवला असला तरी ऊमेदवारी मलाच मिळेल अशी अपेक्षा गांधींना होती.त्यासाठी गांधीनी दिल्लीत फिल्डींगही लावली. शेवटपर्यंत ते आशावादी होते मात्र भाजपाच्या पहील्याच यादीत नगर दक्षिण मधुन सुजय विखेंचे नाव जाहीर झाले. अन् दिलीप गांधीसह त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला.
उमेदवारीचा पत्ता कट केल्यानंतर नाराज झालेल्या गांधींनी लोकसभा निवडणुकीत काय भुमिका घ्यायची याविषयी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी व पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी हा मेळावा होत असुन या मेळाव्यात गांधी काय भुमिका घेणार याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.