शैक्षणिक
…या महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक सादर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे.या कार्यक्रमासाठी अग्निशामक अधिकारी हेमंत कार्ले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे हे होते.

आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक म्हणजे संकटाच्या वेळी स्वतःचा व इतरांचा बचाव कसा करावा,याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण होय.यामध्ये आगीवर नियंत्रण,प्रथमोपचार,आणि भूकंपाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी जाण्याचे मार्ग प्रत्यक्षात करून दाखवले जातात.त्यात आग विझवण्यासाठी सिलिंडरचा वापर कसा करावा,जखमी व्यक्तीला कृत्रिम श्वासोच्छवास किंवा पट्टी बांधणे,आपत्ती आल्यास इमारत तातडीने कशी खाली करावी याबाबत मार्गदर्शन करून जीवित आणि वित्तीय हानी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात.त्याची वर्तमानात मोठी गरज निर्माण झाल्या असून ही गरज ओळखून महाविद्यालयाने हे प्रात्यक्षिक आयोजित केले होते.
सदर प्रसंगी प्रमोद शिनगर,विशाल कासार,संजय विघाते,घनश्याम कुऱ्हे,कला शाखेचे उपप्राचार्य बंडेराव तऱ्हाळ,कैलास शेळके यांसह ज्युनिअर विभागातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रमोद शिनगर यांनी,“विद्यार्थ्यांना अग्नी म्हणजे काय,अग्नीचे प्रकार,आग लागण्याची कारणे,आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना,आग नियंत्रणासाठी वापरावयाचा वायू,संकटकाळात स्वतःची व इतरांची सुरक्षितता कशी राखावी” याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुनियर विभागाचे प्रभारी उपप्राचार्य रवींद्र हिंगे यांनी केले तर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकात उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनिता आत्रे व श्रीम.रुपाली गाढे तर उपस्थितांचे आभार संदीप शिंदे यांनी मानले आहे.



