जयंती,पुण्यतिथी अभिवादन
…या महाराजांचे पाचवे पुण्यस्मरण संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे आत्मा मालिक ध्यान योग मिशन यांच्या वतीने अमरगिरीजी महाराज यांचे पाचवे पुण्यस्मरण नुकतेच भक्तिमय वातावरणात पार पडले आहे.अनेकांनी त्यांच्या स्मृती जागृत केल्या आहेत.

“ह.भ.प.अमरगिरीजी महाराजांचे जीवन हे त्याग,साधना आणि समाजसेवेचा आदर्श आहे.त्यांनी दाखवलेला अध्यात्माचा मार्ग हा मानवतेला दिशा देणारा आहे.त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा दीप आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात अखंड तेवत राहावा”-नंदकुमार सूर्यवंशी,अध्यक्ष,जंगली महाराज ट्रस्ट,कोकमठाण.
त्यावेळी अमरगीरीजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहाटे ५ ते ६ या वेळेत अभिषेक,पादुका पूजन व प्रातः आरती करण्यात आली.त्यानंतर सकाळी ६ ते ७.३० या वेळेत हवन विधी,तर ७.३० ते ८.३० दरम्यान प्रतिमा पूजन व नवनाथ विधी संपन्न झाला.सकाळी ९ ते ११ या वेळेत वारकरी रत्न ह.भ.प.बाळासाहेबजी महाराज (गतीर,इगतपुरी) यांच्या कीर्तन सेवेमुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.सकाळी ११ ते १२ या वेळेत श्रद्धांजली,ध्यान पुष्प अर्पण करून मध्यान्ह आरती झाली.दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने ध्यान योग मिशनचे अध्यक्ष परमानंद महाराज यांनी अमरगिरीजी महाराज यांच्या जीवनकार्याचा सविस्तर परिचय उपस्थितांना करून दिला.त्यांनी अमरगिरीजी महाराजांनी दिलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचे महत्त्व आणि समाजासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.
यावेळी ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी श्रद्धांजली अर्पण करत आपल्या मनोगतात सांगितले, “ह.भ.प.अमरगिरीजी महाराजांचे जीवन हे त्याग,साधना आणि समाजसेवेचा आदर्श आहे.त्यांनी दाखवलेला अध्यात्माचा मार्ग हा मानवतेला दिशा देणारा आहे.त्यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा दीप आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात अखंड तेवत राहावा,हीच त्यांच्या चरणी खरी आदरांजली आहे.”
दरम्यान या कार्यक्रमास सर्व संत,संत माता व आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे पदाधिकारी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण सोहळा शांत,शिस्तबद्ध आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.



