धार्मिक
ऑनलाईन “गौरी आरास” स्पर्धेचे कोपरगावात आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गौरी भक्तांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने ऑनलाईन “गौरी आरास” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.
राज्यात गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर गौरींचे आगमन होत असते.हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्यासाठी गौरी भक्त आपल्या कला,गुणातून भव्य आरास करीत असतात.माहेराला आलेल्या लेकीप्रमाणे गौराईचं कौतुक,पुजा,मान सन्मान करून विविध पदार्थांसह सूंदर अशी आरास देखील केली जाते.महिला मंडळी हा सण अतीशय भक्तीभावाने साजरा करतात.
सदर आरास व देखावे आकर्षक असल्यामुळे गौरी भक्तांमध्ये मोठा आनंद व उत्साह असतो. हा आनंद आणि उत्साह द्विगुणीत करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने यावर्षी ऑनलाईन “गौरी आरास” स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गौरींच्या (महालक्ष्मी) सजावटीचे फोटो ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या व्हाटसअप नंबरवर पाठवायच्या आहेत.
या स्पर्धेतील विजेत्यांना रोख स्वरुपात बक्षिस देखील देण्यात येणार आहे.यामध्ये प्रथम बक्षीस ११ हजार रुपये,द्वितीय बक्षीस ९ हजार रुपये,तृतीय बक्षीस ७ हजार रुपये व चतुर्थ बक्षीस रुपये ५ हजार ठेवण्यात आले आहे.त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या गौरी सणाची तयारी करीत असलेल्या सर्व गौरी भक्तांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन पुष्पाताई काळे यांनी केले असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या गौरीचे आरास केलेले फोटोग्राफ दिनांक ३, ४ व ५ संप्टेंबर या दिवशी ९३२५३२९०६५ व्हाटसअप नंबरवर पाठवावे. यातून गौरींच्या (महालक्ष्मी) सजावटीचे सर्वोत्कृष्ट आरास फोटो निवडण्यात येवून विजेत्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.