वन व पर्यावरण
संवत्सर परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

न्युजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
संवत्सर परिसरातील लक्ष्मणवाडी भागात रविवार व सोमवार असे सलग दोन दिवसापासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील अनेक कुत्र्यांना ठार करुन त्यांचा फडशा पाडल्याचे निदर्शनास आल्याने नागरीकांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वन विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रविवार दि.३० व सोमवार दि. ३१ रोजी असे सलग दोन दिवस लक्ष्मणवाडी (पढेगांव चौकी) भागात प्रतशील शेतकरी बापुसाहेब लक्ष्मणराव परजणे व सूर्यभान लक्ष्मणराव परजणे यांच्या वस्तीजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. कुत्र्याला ठार करुन त्याला फस्त केले. गेल्या सात आठ दिवसांपासून या भागातील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे.
संवत्सर गांवचा परीसर आठ ते नऊ वाड्या वस्त्यांनी विस्तारलेला आहे. परिसरात ऊस व मका पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. याचाच फायदा घेऊन बिबटे रात्रंदिवस आता मानवी वाड्या वस्त्यांमध्ये संचार करु लागले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगल भागात खाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची सोय राहिली नसल्याने जंगली प्राण्यांचा आता पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांमधून वावर सुरु झालेला आहे. रविवार दि. ३० व सोमवार दि. ३१ रोजी असे सलग दोन दिवस लक्ष्मणवाडी (पढेगांव चौकी) भागात प्रतशील शेतकरी बापुसाहेब लक्ष्मणराव परजणे व सूर्यभान लक्ष्मणराव परजणे यांच्या वस्तीजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. कुत्र्याला ठार करुन त्याला फस्त केले. गेल्या सात आठ दिवसांपासून या भागातील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. मोरांची संख्याही कमी झाली असून दररोज पहाटे येणारे मोरांचे आवाजही आता कानी पडत नाही यावरुन बिबट्याने मोरांनाही फस्त केल्याची चर्चा परिसरातून होत आहे. काही ठिकाणी तर शेळ्यांवर देखील बिबट्याने हल्ला केल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी महानुभाव मंदिरात यात्रोत्सव संपन्न झाला या यात्रोत्सवासाठी लद्मणवाडी परिसरातील अनेक लोकांनी हजेरी लावली. रात्र घरी परत येताना पढेगांव चौकीनजीकच्या शाळेच्या कोपऱ्यावर थेट रस्त्यावरच बिबट्या बसलेला असल्याचे अनेकांनी पाहिले. काहिंनी फाटाक्याचे आवाज करीत बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला.परंतु बिबट्या जवळच ऊसाच्या शेतात जाऊन लपला. त्याचा अजुनही या भागात वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे. दररोज शेतात काम करणाऱ्या महिला, शाळेत जाणारी छोटी मुले यांना तर जीव मुठीत धरुन रस्त्याने ये जा करावी लागते. शाळेत गेलेली मुले परत येतील की नाही अशी धास्ती पालकांमध्ये निर्माण झालेली आहे. संवत्सर परिसरातील नऊचारी भागात यापूर्वी देखील बिबट्याचे दर्शन झालेले आहे. परिणामी नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेबाबत वन विभागाला कळवूनही अद्याप कुणीही अधिकारी किंवा त्या खात्याचे कर्मचारी या भागात फिरकले नाहीत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या गाई, म्हसी, शेळ्या, मेंढ्या व इतर पाळीव जनावरे रात्रीच्या वेळी बाहेर मोकळ्या जागेत बांधलेली असतात. अशावेळी बिबट्या या जनावरांना सहज ओढून नेऊन त्यांचा फडशा पाडू शकतो. शेतकऱ्यांच्या या अडचणी विचारात घेऊन वन विभागाने सापळा लाऊन विबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर संवत्सर परिसरातून होत आहे.