जलसंपदा विभाग
…या धरणाच्या लाभक्षेत्रात सात नंबर अर्ज भरण्यास मुदतवाढ !

न्यूजसेवा
कोपरगाव – (प्रतिनिधी)
गोदावरी कालव्यांच्या सर्वच लाभधारक शेतकरी मुदतीच्या आत सात नंबर पाणी मागणी अर्ज भरू शकले नाही त्यामुळे पाटबंधारे विभागाने सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या असल्याची माहिती हाती आली आहे.

गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम सन २०२४-२५ मध्ये खरीप पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात येवून खरीप हंगामातील पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून डाव्या-उजव्या कालव्यांना सात नंबर पाणी मागणी अर्जावर आवर्तन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार १२ ऑगस्ट पर्यंत पाणी मागणी अर्ज भरणे लाभधारक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होते.मात्र हि मुदत नुकतीच संपली असून अजूनही बहुतांश शेतकरी आपले सात नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे दाखल करू शकले नाही.
पावसाळा सुरु होवून जवळपास दोन अडीच महिन्यांचा कालावधी होत आला आहे मात्र अद्यापही गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात अपेक्षित पर्जन्यमान झालेले नाही.त्यामुळे अतिशय कमी पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन,बाजरी,मका,कापूस,तूर,आदी पिके घेतली आहेत.परंतु पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत लाभधारक शेतकरी आवर्तनापासून वंचित राहू नये यासाठी ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत सात नंबर पाणी मागणी अर्ज भरलेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी सात नंबर पाणी मागणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशा सूचना आ.काळे यांनी पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.