खेळजगत
फयाज तांबोळीस राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयाचा तृतीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी फयाज पापाभाई तांबोळी याची युथ गेम फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ४०० मीटर राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करून नेपाळ येथे होणाऱ्या युथ गेम फेडरेशन तर्फे नेपाळच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव व शारीरिक शिक्षक प्रा. डॉ. सुनील कुटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
प्राचार्य डॉ.बी.एस.यादव पुढे म्हणाले की,कोपरगाव तालुक्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात यश मिळवणारे हे एकमेव महाविद्यालय असून आतापर्यंत सोमैया महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले असून फयाज तांबोळी हा चौथा विद्यार्थी या पातळीवर पोहोचला आहे.ही महाविद्यालय व संस्थेच्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद बाब आहे आज पर्यंत विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जवळपास ४८ क्रीडापटू निवडले गेले असून ९६ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पातळीवर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
फयाज तांबोळी हा टाकळीभान येथील पापाभाई या छोट्या शेतकऱ्याचा मुलगा असून तो स्वतः कष्ट करून शिक्षण घेत आहे.याच स्पर्धेत विजय भुईगड याने ८०० मीटर धावणे या प्रकारात रौप्यपदक प्राप्त केले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस. यादव,कार्यालय अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.