गुन्हे विषयक
…गावात एकाच रात्रीत सात चोऱ्या,ग्रामस्थांनी चोरांचा घेतला धसका
जनशक्ती न्यूजसेवा
वाकडी-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील भर गावात व श्रीरामपूर रस्त्यावरील आण्णाभाऊ साठे नगर येथील भर वस्तीत असे मिळून सात ठिकाणी चोरांनी दि.१३ मार्च रोजी पहाटे ०३ च्या सुमारास एक लाख रुपयांच्या आसपास रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.या घटनेने वाकडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाकडी गावात सात ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या त्यात रखमा खरात,अनिल खरात यांची जास्त रोख रक्कम गेल्याने वाकडी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ.संपतराव शेळके यांनी तात्काळ सरपंच सहाय्यता निधीतून दोन्हीही कुटुंबाला मान्यवरांच्या उपस्थितीत आर्थिक मदतीचा धनादेश दिला आहे
या रात्री झालेल्या चोऱ्यांत श्रीरामपूर रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे नगर मधील रखमा खरात या मजुराची सुमारे ६० हजार रुपयांची चोरी झाली विशेष म्हणजे या चोरांनी रखमा खरात यांच्या बंद घरात घुसून धान्याची कोठी घेऊन फरार झाले व रस्त्याच्या पलीकडे शेतात नेऊन त्यातील खरात यांनी नुकतेच गाय विकून ठेवलेली रक्कम काढून घेतली आहे.दरम्यान याच वेळी नवनाथ शेळके यांच्या दुचाकीची चोरी करण्याचा प्रयत्न देखील चोरांनी केला असता शेळके यांना जाग आल्याने त्यांनी आरडाओरडा केल्यावर चोरट्यानी तेथून धूम ठोकली.तर दुसरीकडे भर गावात अनिल खरात यांच्या घरात चोर शिरून २० हजाराच्या आसपास रक्कम चोरून नेली आहे.अनिल खरात यांच्या घराला भिंत नाही त्यांच्या घराच्या भोवती शेडनेट जाळी असल्याने चोरांना घरात सहज शिरकाव करता आला.त्याच वेळी रविंद्र कापसे यांच्या घराचे कडी तोडून चोरांनी घरातील काही रक्कम व दागिने चोरून नेले आहे. वाकडी गावात या मुख्य चोरी बरोबर आणखी चार ठिकाणी चोरांनी घराची झडती घेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसूद खान,सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे,पो.कॉ.कराळे,पोलीस पाटील मच्छिन्द्र अभंग,सरपंच डॉ.संपतराव शेळके,ऍड.भाऊसाहेब शेळके,संदीपानंद लहारे,बाबासाहेब शेळके यांनी सर्व ठिकाणी भेट देत घटनेची माहिती घेतली गावातील काही ठिकाणचे सी.सी.टी.व्ही.फुटेजची तपासणी केली आहे.त्यानुसार पुढील तपास पोलीस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे हे करीत आहे
दरम्यान वाकडी गावात सात ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या त्यात रखमा खरात,अनिल खरात यांची जास्त रोख रक्कम गेल्याने वाकडी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ.संपतराव शेळके यांनी तात्काळ सरपंच सहाय्यता निधीतून दोन्हीही कुटुंबाला आर्थिक मदतिचा चेक दिला आहे.यावेळी गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड.भाऊसाहेब शेळके,खा.डॉ.सुजय विखे पाटील युवा मंच अध्यक्ष संदीपानंद लहारे आदी उपस्थित होते.