अर्थ विषयक
…या नागरी पतसंस्थेच्या सभासदांना पंधरा टक्के लाभांश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील सहकारी पतसंस्थानी कोरोना काळात अनेक चढउतार अनुभवले असून मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील पद्मविभूषण डॉ.शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेने १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा कायम या वर्षी कायम ठेवली असल्याचे प्रतिपादन ठेवत माजी आ.अशोकराव काळे यांनी काढले आहे.
“दिनांक ३१ मार्च २०२० अखेर संस्थेकडे २८ कोटी ६७ लाख ८२ हजाराच्या ठेवी असून अहवाल सालात संस्थेच्या ठेविमध्ये ४ कोटी १० लाखाची वाढ झाली आहे. अहवाल सालात संस्थेने १९ कोटी १२ लाख ८२ हजारांचे कर्ज वाटप केलेले आहे. अहवाल सालात रू.२ कोटी १५ लाख ६० हजारांची कर्जवाटपात वाढ झालेली आहे“-राधुजी कोळपे,अध्यक्ष पवार नागरी सहकारी पतसंस्था.
कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व गौतमनगर परिसरातील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापारी,ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पद्मविभूषण डॉ.शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१९-२० या वर्षाची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार गौतम बँकेच्या सभागृहात मुख्य शाखा गौतमनगर येथे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.यावेळी सभासदांना मार्गदर्शन करतांना माजी आ.अशोक काळे बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन राधुजी कोळपे होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, संस्थेने अल्पावधीतच सर्व सामान्यांचा विश्वास संपादन केलेला आहे.ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवून नियमित व वेळेवर कर्ज पुरवठा करणे व त्याची नियमित कर्ज वसुली करणे,ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी मागणी प्रमाणे तत्काळ परत करणे ही संस्थेच्या दृष्टीने अतिशय विश्वसनीय बाब आहे. संस्थेने अतिशय नियोजनबध्द कामकाज करून ठेवीत मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ संस्थेचे भविष्य उज्वल असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
प्रास्तविक करतांना संस्थेचे चेअरमन राधुजी कोळपे म्हणाले की,”दिनांक ३१ मार्च २०२० अखेर संस्थेकडे २८ कोटी ६७ लाख ८२ हजाराच्या ठेवी असून अहवाल सालात संस्थेच्या ठेविमध्ये ४ कोटी १० लाखाची वाढ झाली आहे. अहवाल सालात संस्थेने १९ कोटी १२ लाख ८२ हजारांचे कर्ज वाटप केलेले आहे. अहवाल सालात रू.२ कोटी १५ लाख ६० हजारांची कर्जवाटपात वाढ झालेली आहे. संस्थेची कर्ज वाटपाचे श्रेय कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहातील कर्मचारी, सभासद बंधू तसेच परिसरातील छोटे-मोठे व्यावसायिक यांनाच आहे.संस्थेचे थकबाकीचे प्रमाण ३.५ % आहे. कोरोनामुळे कर्ज वसुलीवर परिणाम झाला असून थकबाकीत वाढ झालेली आहे.सभासदांनी संस्थेचे घेतलेले कर्ज व हप्ते वेळेवर भरून सहकार्य करावे असे आवाहन केले.अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक काळे बी.डी.यांनी केले.सूत्रसंचलन सुभाष बढे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सोपान गुडघे यांनी मानले.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, गौतम बँकेचे व्हा.चेअरमन धोंडीराम वक्ते तसेच संस्थेचे संचालक उपस्थित होते.