आरोग्य
दुबईवाले बिनधास्त फिरतायत; मुंबई पोलिसांनी घेतली दखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतात करोनाची लागण विदेशातून आलेल्या भारतीय नागरिकांमुळे मुळे झालेली आहे हे सर्वश्रुत आहे. याची दखल घेत सरकारनं व सर्व प्रशासकीय यंत्रणांनी विदेशातून आलेल्या सगळ्यांनी स्वत:चं १४ दिवसांसाठी विलगीकरण किंवा होम क्वारंटाइन करावं असं आवाहन केलं आहे. परंतु या योग्य ती काळजी न घेणारे आणि स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात टाकणारे अनेक नागरिक दिसत आहेत. दुबईहून परतलेल्या अशाच काही जणांची तक्रार मुंबईतील रहिवाशानं सामाजिक संकेत स्थळाच्या माध्यमातून केली आहे. मुंबई पोलिसांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे.
जावेद नावाच्या एका व्यक्तिनं ट्विट केलंय की, “जोगेश्वरी पश्चिमेतील रेहयान टेरेस या इमारतीत माझा भाऊ राहतो. या इमारतीत राहणारं एक कुटुंब तीन दिवसांपूर्वी दुबईहून परत आलं आहे. हे कुटुंब आजुबाजुला सगळीकडे बिनधास्त फिरत आहे. विशेष म्हणजे कालच मुंबई महापालिकेचे अधिकारी त्यांना काल भेटून गेले. परंतु या कुटुंबानं स्वत:ला घरात विलग केलेले नाही.”
हे ट्विट मुंबई पोलिसांना टॅग करून केलेलं आहे. मुंबई पोलिसांनी या ट्विटची लगेच दखल घेतली असून आम्हाला सविस्तर पत्ता सांगा म्हणजे आम्हाला त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल असे उत्तर दिले आहे.
विदेशामधून भारतात पसरलेला करोना हा विषाणू थोपवायचा असेल तर त्याचा प्रसार करणाऱ्या विदेशातून आलेल्या प्रवाशांना व त्याची लागण झालेल्यांना अलग करणे किंवा सोशल डिस्टन्स ठेवणे हा एकच पर्याय सध्या उपलब्ध आहे. असे असूनही विदेशातून आलेले प्रवासी योग्य ती काळजी घेत नसल्याचे काही प्रसंगांमध्ये दिसून आले आहे.