जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना वाढ थांबेना,टाळेबंदीचा जोर वाढला !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत बारा रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून आज केलेल्या २६ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये १४ रुग्ण बाधित झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून १२ संशयीत्यांचे अहवाल निरंक आले आहे,तर उपचारानंतर १४ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असून नगर येथे १९ संशयितांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.तर कोरोना बाधित रुग्णांत कोपरगाव शहरातील दहा असून ग्रामीण भागातील चार असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ५६४ इतकी झाली आहे.त्यात १७२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आतापर्यंत १२ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर २.१२ टक्के आहे.आतापर्यंत २ हजार ९३४ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ११ हजार ७३६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १९.२२ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ३८२ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६७.७३ टक्के झाला आहे.

दरम्यान बाधित रुग्णांत कोपरगाव शहरातील टिळक नगर येथील एक १९ वर्षीय पुरुष,लक्ष्मीनगर येथील एक ३२ वर्षीय स्त्री,माधव बागेजवळ ३५ वर्षीय पुरुष,कासलीवाल कंपाऊंड जवळ २२ वर्षीय पुरुष,ब्राह्मणगल्ली येथील ४७ वर्षीय पुरुष,गांधीनगर येथील तीन बाधित रुग्ण निघाले असून त्यात ६५ वर्षीय पुरुष तर २० व २३ वर्षीय स्त्रीया यांचा समावेश आहे.तर या खेरीज दत्तनगर येथील ३९ वर्षीय पुरुष,संजयनगर येथील एक ४३ वर्षीय पुरुष, तर ग्रामीण भागातील शिंगणापूर येथील ३२ वर्षीय पुरुष तर एक ४५ वर्षीय महिला यांचा तर कोळपेवाडी येथील दोन रुग्ण असून यात एक ५२ वर्षीय पुरुष तर एक ४६ वर्षीय स्त्री आदी चौदा रुग्णांचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०५ हजार ६९२ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा २९ लाख १० हजार ०३२ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ५५ हजार ००२ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०६ लाख ४३ हजार २८९ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २० हजार ०३७ वर जाऊन पोहचला आहे.नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १४ हजार ८२५ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत १८९ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.दोन दिवसात सलग प्रतिदिन दोन मृत्यू झाले आहे.त्यात काल हरिभाऊ बोरावके (वय-७२) व टिळकनगर येथील शाम लकारे (वय-३५) यांचा समावेश आहे तर आज आलेल्या मयताच्या यादीत आलेल्यांत अंचालगाव येथील गांगुर्डे नामक इसम (वय-५०) तर गांधीनगर येथील पठारे नामक पुरुषाचा (वय-४५) समावेश आहे. प्रतिदिन वाढणारे मृत्यू हे अत्यंत चिंताजनक मानले जात आहे.अद्यापही काही उपटसुम्भ व बेताल नागरिक तोंडाला मुखपट्टी बांधत नसल्याने व नको तेथे सार्वजनिक जागी पिचकाऱ्या मारताना दिसत आहे.या साथ वाढीला कारणीभूत होत आहे.या नाठाळांना आता पोलिसी लाठीचीच गरज आहे.त्यासाठी आता अधिकऱ्यानी या बाबत आता कडक भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.या बाबत कोणीही सुज्ञ नागरिक हरकत घेणार नाही.या बाबत राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी आपल्या पित्यांना पुढे करून या साथीबाबत व शहराच्या स्वयंघोषित टाळेबंदी बाबत राजकारण करू नये हे शहर हितासाठी उत्तम.

दरम्यान या रुग्ण वाढीला पायबंद कसा घालावा याचा मोठा यक्ष प्रश्न तालुका व शहर प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शहर बंद करण्याची मागणी केली आहे.कारण बऱ्याच कुटुंबात कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे.अनेक व्यापारी कुटुंबांना कोरोना साथीची लागण झाली आहे.अनेकांनी संगमनेर,नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेणे पसंत केले आहे.मात्र त्याच्या नोंदी मात्र प्रशासनाकडे नसल्याने समूह संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.तर एका कुटुंबातील तेरा जणांना बाधा झाली असून अन्य एका कुटुंबातील बाप आणि मुलगा असे दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहे.तर घरात अजूनही काही सदस्य बाधित असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता कोरोना शहरातील व खेड्यातील प्रत्येक कुटुंबातील नागरिकांच्या दारात उभा राहून दार ठोठावत असल्याचे वास्तव आता प्रत्येकाला स्वीकारावे लागणार आहे.व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आपले कंबर कसावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close