कोपरगाव तालुका
महसूल विभागाचा अजब कारभार! पुतण्याने केली चूलत्याची जमीन हडप

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महसूल आणि पोलीस विभागाचे अचाट कारभार वेळोवेळी सामान्य माणसांना अनुभवयास येत असतात.असाच अजब कारभाराचा अनुभव नुकताच कोपरगाव तहसील कार्यालयात आला असून पुतण्याने वडिलांच्या खोट्या सह्या अंगठे करून चुलत्याला दाखवले अविवाहित व फरार दाखवून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यास हाताशी धरून चुलत्याची जमिन हडप केल्याची धक्कादायक माहिती अड्.एस.व्ही.देव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
“माधव भालचंद्र देव या पुतण्याने कोपरगाव येथील रहिवासी संदीप शिवाजी राजूडे आणि समाधान मोरे यांचे बरोबर जमिन खरेदीसाठी संगनमत करून त्यांना ४० आर व ६० आर जमिन लाखों रुपयांला विकून राहीलेली ०१ हे.३५ आर शेत वडिलोपार्जित जमीन स्वतःचे नावे भालचंद्र कडून बक्षीस पत्राने करून घेवून चुलता हरिश्चंद्र आणि स्वतः ची सख्खी बहिण नुतन यांचा वडिलोपार्जित जमीनीतील हक्क आणि हिस्सा अपहार करून हडप केला आहे”-अड्.एस.व्ही.देव,कोपरगाव.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगावं येथील ग.नं.१८५/३ दोन हेक्टर ३५ आर जमीन हरीश्चद्र गणेश देव आणि भालचंद्र गणेश देव या दोघा सख्खा भावांना त्यांचे आजोबा महादेव गोपाळ देव हे १९६४ साली वारल्यानंतर वारसा हक्काने समसमान मिळालेली होती.त्याप्रमाणे महसुल फेरफार ची दोघा भावांची रीत नं.१ ची मालकी हक्काची नोंद सदर जमीनीचा ७/१२ उताऱ्यावर सातत्याने २०१८ पर्यत होती.
हरिश्चंद्र देव हे नोकरी निमित्ताने पुण्यात अनेक वर्षांपासून रहात असल्याने व ते आता तब्बल ९३ वर्षांचे असल्याने ब्राह्मणगावला येत नसल्याचा गैरफायदा घेऊन त्यांचा पुतण्या माधव भालचंद्र देव याने वडील भालचंद्र देव यांचेही ८९ वर्ष वयाचा व अगतिकतेचा गैरफायदा घेऊन भालचंद्रच्या नावे खोट्या सह्या अंगठे करून “हरिश्चंद्र ५० वर्षांपासून परागंदा आहे.तो अविवाहित होता” म्हणून त्याचे ७/१२वरील नावाची पोकळीस्त नाव म्हणून नोंद कमी करण्याचा अर्ज दिला.तत्कालिन तहसिलदार किशोर कदम,मंडलाधिकारी खिवराज दुशिंग,तलाठी एन.आर.जावळे,यांनी त्या प्रकरणी अर्जाची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केली नाही.नोटीसा काढल्या नाहीत.हरिश्चंद्र च्या१९६४ पासून वारसा मालकी हक्काच्या नोंदी असतांना अर्जातील मजकूराची खात्री न करता, बेकायदेशीर रितीने हरिश्चंद्र चे नाव पोकळीस्त आहे असा आदेश काढून कमी केले होते.
परिणामी भालचंद्र देव याचे एकट्याचे नावं ७/१२ उताऱ्यावर राहिल्यानंतर भालचंद्र चे ८९ वर्षी त्याची व्याधीग्रस्त गलितगात्र असलेचा गैरफायदा घेऊन,नाटेगांव ता.कोपरगांव येथिल संदीप शिवाजी राजूडे आणि समाधान मोरे यांचे बरोबर जमिन खरेदीसाठी संगनमत करून त्यांना ४० आर व ६० आर जमिन लाखों रुपयांला विकून राहीलेली ०१ हे.३५ आर शेत वडिलोपार्जित जमीन स्वतःचे नावे भालचंद्र कडून बक्षीस पत्राने करून घेवून चुलता हरिश्चंद्र आणि स्वतः ची सख्खी बहिण नुतन यांचा वडिलोपार्जित जमीनीतील हक्क आणि हिस्सा अपहार करून हडप केला.सदरचे विक्री आणि बक्षीसपत्राचे तिन्ही व्यवहार देखिल एकाच दिवशी एकमेकांचे व्यवहारास साक्षीदार दाखवून संशयास्पद परिस्थितीत नोंदविलेले आहे.त्यानंतर ३ महीन्यात भालचंद्र देव यांचे निधन झाले होते.
हरिश्चंद्रने याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी नगर,प्रांताधिकारी शिर्डी आदी वरीष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे १५मार्च २०२१ रोजी लेखी तक्रार केली होती. जिल्हाधिकारी नगर यांनी देखील तत्परतेने १९एप्रिल २०२१ रोजी या गंभीर गुन्हेगारी व बेकायदेशीर कारवाई ची चौकशी करून ताबडतोब अहवाल देण्याबाबत तहसिलदार कोपरगाव यांना लेखी हुकूम केले होते. परंतु यात महसूली कर्मचाऱ्यां विरूद्ध आरोप असल्याने गेल्या १ वर्षात आज पर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही म्हणून नाईलाजाने हरिश्चंद्रने “मी परागंदा नाही,अविवाहित पण नाही,तसेच मला पत्नी व दोन मुली असुन आम्ही पुणे येथे राहातो “त्यामुळे ज्या अर्जात मला परागंदा अविवाहित असे दाखवून माझ्या मालकी हक्काच्या जमिनी वरील नाव पोकळीस्त असे बेकायदेशीरपणे कमी कलेले माझे नाव पुनः पुर्ववत गट नं.१८५/३ वर मालक म्हणून नोंदवून जमिन प्रत्यक्ष ताब्यात देवून त्या जमीनीचा संगनमताने अपहार करण्याविरूध्द सक्त कायदेशीर कारवाई करणेसाठी हरिश्चंद्र देव वय-९३ वर्षे व पत्नी सौ पदमजा हरिश्चंद्र देव वय -८३ हे वृद्ध दांपत्य आज तहसिलदार कोपरगाव, यांना आज समक्ष भेटले आहेत.
दरम्यान हे वृद्ध दांपत्य प्रांताधिकारी शिर्डी तसेच जिल्हाधिकार्यांना ही भेटणार आहेत.त्यांना त्यांचे यातील न्याय हिस्सा मिळावा एवढीतरी माफक अपेक्षा महसूल विभागाकडून व्यक्त केली आहे.त्यासाठी कडक कारवाईसाठी बडगा उगारणारे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले ताबडतोब दखल घेतील असा आशावाद व्यक्त केला आहे.
दरम्यान तहसीलदार विजय बोरुडे यांची आज समक्ष भेट घेतल्यावर सर्व हकीकत जाणून घेत या सर्व प्रकरणावर त्वरित अहवाल सादर करावा म्हणून संबंधितांना आदेश केले आहेत. आ.आशुतोष काळे यांचीही या वृद्ध दाम्पत्यांनी तहसील कार्यालयात सुरू असलेल्या जनता दरबारात जाऊन भेट घेतली,आ.काळे यांनी आस्थेने चौकशी करत तहसीलदार बोरुडे यांना बोलावून घेतले व या प्रकरणात त्वरित लक्ष घालून या वयात यांना येथे परत चकरा मारायला लावू नका म्हणून सुनावले आहे.