कोपरगाव तालुका
कोपरगावच्या नागरिकांना पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच पाणी पुरवठा करा – आ. आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील कमी झालेला पाणीसाठा लक्षात घेऊन कोपरगाव नगरपरिषदेने सहा दिवसाने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून कोपरगाव नगरपरिषदेने कोपरगावच्या नागरिकांना पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच पाणी पुरवठा करा अशा सुचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहेत.
कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील कमी झालेल्या पाणीसाठ्यामुळे नागरिकांना सहा दिवसाने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कोपरगाव नगरपरिषदेने घेतला होता. या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची भेट घेऊन त्याबाबत माहिती घेतली असता त्यांनी साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्याचे कारण पुढे केले. सदरची बाब राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी माझ्या निदर्शनास आणून दिली होती.
नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाणी टंचाईबाबत माहिती दिली. कोपरगाव शहराच्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव भरण्यासाठी ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडावे.कोपरगाव शहरातील नागरिकांना नियोजित पाणीपुरवठा व्हावा यासाठी शहराला पाणीपुरवठा करणारे साठवण तलाव भरण्यासाठी तातडीने ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडावे अशी मागणीही केली होती. सदर मागणीला पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद देऊन गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याचे मान्य केले आहे. या आवर्तनातून कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने पाणीपुरवठा करणारे सर्व साठवण तलाव घेवून कोपरगाव शहरातील नागरिकांना पूर्वीच्या वेळापत्रकानुसारच पाणी द्यावे. मुबलक पाणी उपलब्ध असतांना देखील कोपरगाव शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवू नका अशा सुचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला दिल्या आहे.