कोपरगाव तालुका
आत्माभिमुख साधना मानवी मनाला निर्मळ बनविते – मीराबाई मिरीकर
संपादक-नानासाहेब जवरे
संवत्सर-(प्रतिनिधी)
संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त गोदावरीच्या काठावरील श्री शंगऋषींच्या मंदिराजवळ महिलांनी स्नानांची पर्वणी साधली. यानिमित्त शनी मंदिराच्या प्रांगणात ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी त्या बोलत होते.
सदर प्रसंगी ह. भ. प. सोपानकाका करंजीकर, ह. भ. प. माऊली महाराज ( संगमनेर ), ह. भ. प. सुराशे महाराज, ह. भ. प. भानुदास महाराज बोळीज, ह. भ. प. वाल्मिक महाराज जाधव, ह. भ. प. वाकचौरे, कृष्णराव परजणे, उपसरपंच विवेक परजणे याप्रसंगी उपस्थित होते.
ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साध्य करण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केलेली होती. समाधानकारक पावसामुळे यंदा नदीला पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता. औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर अशा विविध ठिकाणावरुन भावीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोदावरीच्या स्नानाबरोबरच किर्तन श्रवणाची पर्वणीही साधून घेतली. किर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. श्री शंगेश्वर ऋषी व श्री चक्रधर मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतले. या निमित्ताने संवत्सरला श्री क्षेत्र पंढरपूरचे स्वरुप प्राप्त झाले होते.
त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,ज्ञान आणि विज्ञानाला आध्यात्माची जोड देवून भौतिक समृध्दी साधता येते. ही समृध्दी टिकविण्यासाठी निकोप व सलोख्याचे संबंध निर्माण करण्याची आज नितांत गरज आहे. जीवनात चांगल्या गोष्टींचे आचरण म्हणजे चारित्र्य होय. जो चारित्र्याचा अंगिकार करतो त्याचे जगणे सफल होते. चारित्र्यहीन माणसे जिवंत असूनही मृतवत असतात. चारित्र्याला जपताना परमेश्वराची निरामय भक्ती करावी. अशा भक्तीमुळे माणसाच्या अंगी निर्भयता येवून त्याचे आत्मतेज उजळून निघते. समस्यांवर मात करण्याचे मार्ग त्याला सापडतात. असे सांगून मीराबाई मिरीकर यांनी ऋषीपंचमीचे महत्व व या दिवशी महिलांनी आचरण करावयाचे नियम याबाबत मार्गदर्शन केले. माणसाने लोभ आणि हव्यासापासून नेहमी दूर रहावे. कारण हे जगण्यातले खूप मोठे अडसर आहेत. कोणत्याही गोष्टींचा हव्यास हा माणसाला विनाशाकडे घेवून जातो.ऋषी – मुनींची परमेश्वरावर अपार श्रध्दा होती म्हणूनच त्यांचे जीवन निरामय आणि निर्विकार होते. स्व. नामदेवराव परजणे आण्णा देखील अशाच ऋषी – मुनींसारखे जगले. त्यांनी जीवनात आदर्श निर्माण केला. संवत्सरला ऋषीपंचमीनिमित्त आण्णांनी सुरु केलेली किर्तनाची परंपरा युगानुयुगे चालणार असून गोदावरीच्या काठावरील हा आध्यात्मिक यज्ञ अखंडपणे तेवत ठेवण्यसाठी संवत्सरकरांनी प्रयत्नशील रहावे असेही त्या शेवटी म्हणाल्या.
प्रारंभी गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी ग्रामस्थांच्या च्यावतीने मीराबाईंचा सत्कार करुन उपस्थितांचे स्वागत केले.आलेल्या भावीक भक्तांचे आभार ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांनी मानले.