कोपरगाव तालुका
..या गावात महिलेला पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गव्हाणे वस्तीवर रहात असलेली महिला सुमनबाई ज्ञानदेव गव्हाणे (वय-५४) यांना आज सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान आपल्या घराच्या बाहेर आल्यावर एका अज्ञात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे.त्यांच्या घरातील माणसांच्या हि बाब लक्षात आल्यावर त्यांनी काठी घेऊन त्या कुत्र्याच्या तावडीतून या महिलेची सुटका केली आहे.
रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात.रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे.मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे.कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात.जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो.ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो.आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो.कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
या घटनेनंतर घटना स्थळावरून या कुत्र्याने पळ काढला आहे.मात्र या कुत्र्याचा अद्याप अन्य ग्रामस्थांना धोका असल्याने त्याचा बंदोबस्त अंजनापूर ग्रामपंचायतीने करावा अशी मागणी अंजनापूर व जवळके येथील ग्रामस्थांनी केली आहे.या जखमी महिलेला प्रथम उपचारार्थ आधी पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले आहे.या घटनेने अंजनापूर,रांजणगाव देशमुख,बहादरपूर आदी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.