कोपरगाव तालुका
कोपरगावात भाजीपाला लिलावाचा फज्जा उडाला !

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूने एकीकडे कहर उडवलेला असताना त्यासाठी सरकार शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन आकंठपणे ओरडून-ओरडून सांगत आहे.तरीही काही मानवरूपी दगडांवर परिणाम होत नसल्याचे वारंवार स्पष्ट होत असून त्याचा अनुभव कोपरगाव नगरपरिषद हद्दीत भाजीपाला लिलावाच्या वेळी आज सकाळी पुन्हा एकदा आला असून या बाबत आ. आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी बाजार समितीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व सचिव यांना शारीरिक अंतर पाळण्याबाबत योग्य नियोजन करण्याबाबत तंबीच दिली आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या जागेत शेतकरी व व्यापारी यांना लिलावाच्या ठिकाणी त्यांच्या जागेत पायाभूत सोयी देने गरजेचे आहे.या शिवाय शारीरिक अंतर पाळण्यासाठी काही खुणा करून त्यावर व्यापारी व शेतकऱ्यांना सुरक्षित अंतर पाळण्यास बाध्य करावे-आ. आशुतोष काळे
भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २६० ने वाढून ती ३१ हजार ६२० इतकी झाली असून १०१० जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ९ हजार ३१८ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ४०० जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ४२ वर जाऊन पोहचली आहे तर चौघाचा मृत्यू झाला आहे.कोपरगाव तालुक्यात दोन महिलांचा बळी गेला आहे.वर्तमानात हि वाढ थांबलेली दिसत असली तरी ती फार दिवस थांबेल असे वाटत नाही.या बाबत नागरिकांचे बेजबाबदार वर्तन पहिले की हि भीती साधार वाढते.गर्दी करू नका शारिरिक अंतर पाळा हे कानी -कपाळी ओरडूनही उपयोग होताना दिसत नाही.पोलिसांच्या व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या कारवाईचे आकडे पाहिले तरी हि बाब कोणाही सुज्ञास सहज कळून येईल.बाजार समितीच्या प्रशासनाच्या या बेपर्वाईमुळे व्यापारी,बाजार समिती कर्मचारी,शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर करून सव्वा महिना उलटत आला तरी या बाबत बाजार समिती प्रशासनाच्या कारभारात सुधारणा होताना दिसत नाही हे विशेष ! या बेजबाबदार नागरिकांमुळे देशाची नाहक टाळेबंदी वाढून अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.अनेकांची रोजी-रोटी हिसकावली जात आहे.त्यामुळे नाईलाजाने सरकारला वाढत्या संक्रमणामुळे महाराष्ट्रातील टाळेबंदी ३ मे पर्यंत सरकारने वाढवावी लागली आहे.कोपरगाव तालुक्यात यापूर्वीच दोन बळी गेले आहे.नागरिकांत अद्यापही या साथीबाबत भय दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेने आज बाजार समितीचे पदाधिकारी राजेंद्र निकोले व सचिव परशराम शिनगर यांना पाचारण करून कान उपटणी केली आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या जागेत शेतकरी व व्यापारी यांना लिलावाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करून देणे गरजेचे असताना त्याकडे कानाडोळा केला जात असून त्यांच्या जागेत दुर्गंधी दूर करून पायाभूत सोयीसह पेव्हर ब्लॉक बसवणे गरजेचे आहे.नेहमीच्या व्यापाऱ्यांना ओळखपत्रे देऊन गर्दी कमी करावी शेतकऱ्यांना अग्रक्रम द्यावा,या शिवाय शारीरिक अंतर पाळण्यासाठी काही खुणा करून त्यावर व्यापारी व शेतकऱ्यांना सुरक्षित अंतर पाळण्यास बाध्य करावे.व्यापाऱ्यांची यादी आम्ही देत आहोत-नगराध्यक्ष विजय वहाडणे
सदर प्रसंगी कोपरगावचे आ. आशुतोष काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,माजी अध्यक्ष मंगेश पाटील,राष्ट्रवादीचे गट नेते विरेन बोरावके,नगरसेवक मंदार पहाडे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,आदी मान्यवरांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.