जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सकारात्मक जीवनासाठी शिवचरित्राचा अभ्यास आवश्यक-जळकेकर महाराज

न्यूजसेवा

संवत्सर-(शिवाजी गायकवाड)

   छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र,पराक्रम,शुरता,निर्णयक्षमता हे गुण सर्वांसाठीच प्रेरणादायी असून आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या,अनिश्चित काळातही आनंदी राहण्यासाठी सकारात्मक जीवनाचा आदर्श म्हणून शिवचरित्राचा अभ्यास व अनुकरण करणे अतिशय गरजेचे आहे असे प्रतिपादन जळके येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात केले आहे.

  

“वर्तमान युगात परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालल्याने जिकडे तिकडे अराजकता वाढत आहे.अहंभाव दूर करण्यासाठी मनाची कवाडे उघडी करून संस्काराने,विचारचे धन जोडता आले तर जीवन धन्य होईल”-उद्धव महाराज,श्रीक्षेत्र नेवासा.

  गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून ” शिवचरित्र : प्रेरणादायी वाटचाल “या विषयावर ह.भ.प. जळकेकर महाराज बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प.उध्दव महाराज हे होते.

    सदर प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,ह. भ.प.मनसुख महाराज दहे,विनायक महाराज वाघ,भऊरचे संजय महाराज जगताप,महंत दामोदरबाबा महानुभाव,महंत नितीनबाबा महानुभाव यांची उपस्थिती होती.

त्यावेळी पूढे बोलताना ते म्हणाले की,”शिवाजी महाराज बुध्दिप्रामाण्यवादी,प्रयत्नवादी आणि विज्ञाननिष्ठ होते.त्यांनी कधी भविष्य, पंचांग,मुहूर्त पाहिला नाही.कर्मकांडावर विश्वास न ठेवता स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांचा प्रचंड विश्वास होता.प्रजेचे रक्षण,त्यांचे कल्याण, त्यांना संकटात मदत करणे हेच खरे पुण्य असल्याचा त्यांचा दृष्टीकोन होता.शिवरायांचे व्यवस्थापन आधुनिक युगात देखील सर्वांसाठी प्रेरणादायी व उपयुक्त आहे.जलव्यवस्थापन,वृक्षसंवर्धन,रयतेविषयी प्रेम आस्था,काळजी आणि गडकोट किल्यांची मजबूत बांधणी,युध्दनीती या सर्व गुणांमुळेच ते आजही संपूर्ण विश्वात वंदनीय तर आहेच,परंतु कोणाशी कधी युती करायची आणि कोणाशी कथी आघाडी करायची याबाबतीत शिवाजी महराज तज्ज्ञ होते.राजकारण हा देखील त्यांच्या विलोभनीय प्रतिभेचा आविष्कार होता.

   चारित्र्य आणि चरित्र कसे असावे,हे शिवारायांच्या जीवनातील अनेक प्रसंगामधून अनुभवायला मिळते.परस्त्रीला माता म्हणणे हे शिवरायांचे संस्कार भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी तेजोमय अशी प्रेरणा आहे.शिवरायांनी मोठा गौरवशाली इतिहास आम्हाला दिलाय.त्या इतिहासाकडे पाहिल्यानंतर आमचं भविष्य देखील गौरवशाली आहे हे पटल्याशिवाय रहात नाही.हे गौरवशाली भविष्य घडवायचे असेल तर,इतिहासाकडे कटाक्ष टाकणे,इतिहास समजावून घेणे आणि त्या इतिहासाचे वारस म्हणून त्या इतिहासाच्या पदचिन्हांचा मागोवा घेत त्यावरुन मार्गक्रमण करीत राहणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे.महाराजांचे शौर्य आणि युध्दीमत्ता युगानुयुगे आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामांन्याचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करीत शत्रू पक्षावर मात करुन मराठ्यांचे नांव जगाच्या इतिहासात अजरामर करुन ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आजच्या समाजासाठी प्रेरणादायी वाटचाल असल्याचेही शेवटी जळकेकर महाराज यांनी म्हटले आहे.

   ज्येष्ठ किर्तनकार उध्दव महाराज मंडलिक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.सध्याच्या धावपळीच्या युगात परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालल्याने जिकडे तिकडे अराजकता वाढत आहे.अहंभाव दूर करण्यासाठी मनाची कवाडे उघडी करा.संस्काराने,विचारचे धन जोडता आले तर जीवन धन्य होईल.नामदेवराव परजणे आण्णांसारखी मोठ्या मनाची माणसे आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहेत.त्या प्रेरणेतून समाज घडावा,विश्वबंधुत्वाची भावना प्रत्येकांमध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षाही मंडलिक महाराज यांनी व्यक्त केली.सदर प्रसंगी जि.प.च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी नामदेवराव परजणे यांच्या कार्यास उजाळा दिला आहे. 

नामदेवराव परजणे यांच्या ” जीवन आणि कार्याची प्रेरणादायी वाटचाल ” या माहितीपटाच्या स्कॅनकोडचे अनावरण उध्दव महाराज व जळकेकर महाराज यांच्याहस्ते करण्यात आले.संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामदेवराव परजणे पाटील शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले.कोपरगांव येथील महिला महाविद्यालयाच्या “कुपासिंधू ” नियतकालिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.तसेच संवत्सर येथील बाळासाहेब सहाणे टेलर यांच्यातर्फे कोपरगांव येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

सदर प्रसंगी स्व.नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी प्रास्तविक केले तर शालिनी विखे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close